मालवण शहरातील कुत्रे निर्बीजीकरण मोहीम पुन्हा सुरू होणार

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली माहिती

मालवण ता.०७-:* मालवण शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी मालवण नगरपालिकेने २०१७ साली सुरू केलेली कुत्रे निर्बीजीकरण मोहीम ही ठेका घेतलेल्या एजन्सीने काम सोडल्याने बंद पडल्यानंतर या कामासाठी काढलेल्या चवथ्या वेळच्या नव्या निविदेला अखेर प्रतिसाद मिळाला आहे. कोल्हापूरच्या सोसायटी फॉर ऍनिमल प्रोटेक्शन या संस्थेने मालवणातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यास अनुकूलता दर्शविली आहे त्यामुळे लवकरच या कामास प्रत्यक्षपणे सुरूवात होईल, अशी माहिती मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली आहे.

भटक्या कुत्र्यांची समस्या ही मालवण शहराची गेले अनेक वर्षांपासून डोकेदुखी ठरली असून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्याने नागरिकांमधून केली जात आहे. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या कार्यकाळात २०१७ साली कांदळगावकर आणि तत्कालीन आरोग्य सभापती आपा लुडबे यांच्या पुढाकारातून कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कुत्रे निर्बीजीकरण मोहीम नगरपालिकेच्या आवारात सुरू करण्यात आली होती. या मोहिमेद्वारे भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्यात येत होती. काही महिने ही मोहीम राबविल्यानंतर हे काम करणाऱ्या संबंधित एजन्सीने काम करण्यास असमर्थता दर्शविल्याने हे काम थांबले होते. मात्र पुढे ही मोहीम पुन्हा सुरू न झाल्याने तसेच भटक्या कुत्र्यांचा संचार व प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

या पार्श्वभूमीवर या कामाच्या नव्या निविदेस प्रतिसाद मिळाल्याची माहिती माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. हे काम करणाऱ्या संबंधित एजन्सीने काम सोडल्यावर त्यानंतर दोन वर्षे नगरपालिकेने या कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. पण त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर चौथ्या वेळी डिसेंबर २०२१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला असून सोसायटी फॉर ऍनिमल प्रोटेक्शन कोल्हापूर या संस्थेची निविदा मंजूर करण्यात आली आहे. या कामाचे आदेश संबंधित निविदा धारक संस्थेला देण्यात आले आहेत. या नसबंदी केंद्राचे बांधकाम सध्या आडारी येथे सुरू आहे. लवकरच त्याठिकाणी कुत्र्यांचे निर्बीजीकरण काम सुरू करण्यात येईल, असेही महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page