हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
ओरोस-:होळी सणा निमित्त झालेल्या जाणाऱ्या रंगपंचमी वेळी प्रतिबंधित रासायनिक रंगाची विक्री करणाऱ्यांवर आणि बळजबरीने रंग फासून फुगे फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने जिल्हा प्रशासनाजवळ निवेदनाद्वारे केली आहे.
सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती व अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याजवळ निवेदन दिले आहे. यावेळी रवींद्र परब, सुरेश दाभोळकर व गजानन मुंज उपस्थित होते. देण्यात आलेल्या निवेदनात, दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सतप्रवृत्ती मार्ग दाखविणारा उत्सव म्हणजे होळी सण आहे. परंतु दुर्दैवीपणे सध्या या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे.
या दिवशी बोंबा मारणे, अचकट शिव्या देणे, तोंडास काळे फासणे, मद्य पिऊन धिंगाणा घालणे, असे हिडीस प्रकार केले जातात. ‘कचऱ्याची होळी करा, पुरणाची पोळी दान करा’ असे शास्त्रीय तसेच धर्मश्रद्धांचे भंजन करणारे उपक्रम काही नास्तिकवादी संघनांकडून राबवण्यात येत आहेत.
रंगपंचमीला स्त्रियांवर रंग उडवणे. त्यांची छेड काढणे. अश्लील चाळे करणे, घाणेरड्या पाण्याचे फुगे मारणे यामुळे भयग्रस्त वातावरण बनून जाते. नागरिक, महिला, मुली यामुळे घराबाहेर पडत नाहीत. परिणामी सुरक्षितता आणि धार्मिक उत्सवांचे पावित्र्य या घटनांनी गंभीर बनले जाते. त्यामुळे रासायनिक रंग विक्री करणाऱ्या व्यक्तींवर व याद्वारे रंग फासणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
