सीओ संतोष जिरगे यांना विश्वास
मालवण ता.०५-:* पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या मालवण शहरात स्वच्छते साठी नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील असून शहरातील काही स्वयंसेवी संस्थाही स्वच्छतेसाठी चांगल्या संकल्पना राबवत आहेत. स्वच्छता उपक्रमात तंत्रज्ञानाचा उपयोग झाल्यास या कार्यात सुलभपणा येऊ शकतो. शहरातील समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी निधी मिळावा अशी मागणी आपण शासनाकडे केली आहे. प्रशासन व नागरिक यांचे संयुक्त प्रयत्न सुरू राहिल्यास येत्या दोन वर्षात मालवण शहराला स्वच्छतेचे वळण लागेल असा विश्वास मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी येथे बोलताना केले.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मालवण नगरपालिकेतर्फे स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील सहा स्पर्धकांनी स्वच्छता व टेक्नॉलॉजी विषयी बनविलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण चिवला बीच हॉटेलच्या सभागृहात संपन्न झाले.
या प्रकल्पांचे परीक्षण मुख्याधिकारी संतोष जिरगे, आवेक्षक सुधाकर पाटकर, अधिकारी सोनाली हळदणकर, माजी नगरसेवक नितीन वाळके, मंदार केणी यांनी केले. प्रास्ताविक शहर समन्वयक निखिल नाईक यांनी केले. या स्पर्धेत युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेतर्फे मेगल डीसोजा हिने किनाऱ्यावरील कचरा व शहरातील कचरा याचे व्यवस्थापन कसे करता येईल यावर प्रकल्प सादर केला. अक्षय रेवंडकर यांनी दांडी झालझुल वाडी मित्रमंडळातर्फे किनाऱ्यावरील स्वच्छता, प्लास्टिक बॉटलचा कलात्मक उपयोग याविषयी प्रकल्प सादर करत प्लास्टिक बॉटल वापरून खाद्यपदार्थ बनविणाऱ्या कंपन्यांनीच निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याची जबाबदारी घेतल्यास प्लास्टिक कचरा निर्माण होण्यास आळा बसेल असे सुचविले. तर शुभम हळदणकर यांनी स्वच्छ मालवण या नावाने निर्माण केलेल्या ऍप विषयी प्रकल्प सादर करत या ऍप द्वारे विविध कार्यक्रमात शिल्लक राहणारे अन्न गरजूंपर्यंत कसे पोहचविता येईल, तसेच शहरात विविध ठिकाणी साचलेल्या कचऱ्याबाबत या ऍप द्वारे नागरपालिका व स्वयंसेवी संस्थांना कसे कळविता येईल याची माहिती दिली.
तर महेंद्र पराडकर यांनी किनारा स्वच्छता बाबत बायो फर्टिलायझर या संकल्पनेवर प्रकल्प सादर करत समुद्रातून येणारे समुद्री शेवाळचा खत म्हणून तसेच औषधासाठी कसा उपयोग करता येईल यासाठी युनिट निर्माण करण्याबाबत माहिती दिली. धक्का मित्रमंडळातर्फे अनिकेत चव्हाण याने नागरिक क्यूआर कोड सिस्टीम द्वारे नगरपालिकेला कचरा उचल करण्याबाबत कसे कळवू शकतात या प्रकल्पाचे सादरीकरण केले. तर गायत्री कामतेकर यांनी रिव्हर्स वेंडिंग मशीन फॉर वेस्ट मॅनेजमेंट यावर प्रकल्प सादर करत प्लास्टिक व काचेची बॉटल जमा करून घेणारी वेंडिंग मशीन मालवणात बसवून बॉटल मागे नागरिकांना पैसे दिल्यास लोकांमध्ये बॉटल न फेकण्याबाबत तसेच त्या गोळा करण्याबाबत जागरूकता निर्माण होईल, असे सांगितले. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी सर्व स्पर्धकांच्या प्रकल्पांचे कौतुक केले. तर मंदार केणी यांनी मालवण शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रभाग निहाय नागरिकांची पथके बनवून स्वच्छतेविषयी जनजागृती केली पाहिजे.
स्वच्छतेसाठी नगरपालिका प्रयत्नशील आहे मात्र नागरिकांनी देखील सहभाग दाखवावा असे सांगितले. तर नितीन वाळके यांनीही स्वच्छतेत नागरिकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगत मालवण शहरावर पर्यटकांचा अतिरिक्त बोजा असल्याने स्वच्छतेबाबत मोठे कार्य घडले पाहिजे. शहरातील आजची पिढी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी विचार करत आहे हीच मोठी गोष्ट आहे असे सांगितले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मागाहून करण्यात येणार आहे. सूत्रसंचालन निखिल नाईक यांनी केले. यावेळी स्वाती पारकर, शैलजा पाटील आदी व इतर उपस्थित होते.
