दुसऱ्या दिवशीही शिवभक्तांच्या गर्दीचा उच्चांक कायम : कोरोना नियमावली नुसार भाविकांनी घेतले दर्शन
देवगड ता.०२-:*श्री.देव कुणकेश्वरच्या यात्रोत्सवाची सांगता बुधवारी पवित्र स्नानाबरोबर मोड यात्रेने झाली आहे. यात्रेच्या दुस-या दिवशीही बुधवारी शिवभक्तांनी गर्दीचा उच्चांक कायम ठेवून कोरोनाचे नियम पाळून भाविक दर्शन घेत होते. यामुळे दुस-या दिवशीही कुणकेश्वर नगरी भक्तीसागरामध्ये वाहुन गेली होती.
गटागटाने असलेले शिवभक्त पंढरपुरच्या धरतीवरती रांगांमध्ये शिवनामाचा महिमा गात होते. त्यामुळे सर्व भाविक त्यात रमुन तहान भुक विसरुन शिवभक्तीमध्ये एकरुप होत होते. भजनी मेळयांची सेवा बुधवारीही अखंडित चालू होती. मालवण मसुरे येथील जैन भत्तेश्वराची देवस्वारी मंगळवारी सायंकाळी कुणकेश्वर भेटीला आली होती. यावेळी प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. अनेक खांबकाटी शिवकळा घेवून आलेली देवस्वारी पाहून दर्शन घेण्यासाठीही उपस्थितांची झुंबड होती.
सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून देवस्थान कमिटी व पोलीसांतर्फे योग्य नियोजन करण्यात आले होते. यात्रेच्या रस्त्याच्या दुतर्फा ठिकाणी मालवणी खाजा,मिठाई,दुकाने,हॉटेल,गृहोपयोगी वस्तू,महिला वर्गांचा खरेदी करण्याचा कल दिसून येत होता. कुणकेश्वर यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी पर्यटनाचा देखील आनंद लुटला आहे. श्रीदेव कुणकेश्वराचे दर्शन झाल्यानंतर समुद्रामध्ये स्नान तसेच किना-यावरुन घोडयांची रपेट व उंटांची सफर करण्याबरोबर फोटो ग्राफिचाही आनंद भाविक घेत होते.
त्याचबरोबर किना-यावर असलेल्या भेळ,आईस्क्रीम,हॉटेल्स चा आस्वाद भाविक घेत होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत मोड यात्रेतील खरेदीसाठी भाविकांची गर्दीही दिसून येत होती. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी कुणकेश्वरची यात्रा गाव मर्यादितच झाली होती. मात्र यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कुणकेश्वरची यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये कोरोनाचे नियम पाळून संवन्न झाली आहे. जगावरती आलेली कोरोना विषाणूची व तिस-या महायुध्दाची आपत्ती दुर होवून जागतीक शांतता निर्माण व्हावी यासाठीही भाविकांनी कुणकेश्वर चरणी साकडे घातले आहे.
