कणकवली ता.०२-:* चांगले कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणे आवश्यक असते , पुरस्कार प्रेरणादायी असतात यामुळे पुरस्कार प्राप्त व्यक्ति अधिक उत्साहाने काम करु शकतो असे मत गवाणे हायस्कुलचे मुख्याध्यापक ए.एच्. मुल्ला यांनी व्यक्त केले.
देवगड तालुक्यातील फणसगाव शिक्षण संस्थेच्यावतीने फणसगाव हायस्कुल व जुनिअर कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य मलगोंडा रामचंद्र जाधव यांच्यावतीने त्यांचे सुपुञ स्वर्गीय शिवानंद मलगोंडा जाधव यांचे स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रत्येक वर्षी दिला जातो. या वर्षी मुल्ला यांना हा पुरस्कार देण्यात आला. शाल , श्रीफळ , सन्मानपञ व रोख रक्कम या स्वरुपात हा पुरस्कार दिला जातो. मुल्ला सर हे गेली 33 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत .आतापर्यंत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.या पुरस्कारासाठी आपली निवड केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध नारकर होते तर प्रमुख पाहूणे म्हणून कार्यवाह प्रभाकर नारकर उपस्थित होते. यावेळी प्राचार्या सौ. पुजा कोरगावकर , स्थानिक समितीचे संतोष चव्हाण , नारकर गुरुजी बहुसंख्य ग्रामस्थ, पालक , विद्यार्थी , प्रशालेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंंचालन व्ही. डी. पाटील यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार सहा. शिक्षक गावकर सर यांनी मानले.
