कणकवली ता.२६-:* संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय तृतीय वर्धापन दिन सोहळा आणि संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४५ वी जयंती संस्थेचे संस्थापक राज्यध्यक्ष संजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इतिहास विषयाचे तज्ज्ञ अभ्यासक आणि विचारवंत प्रा डॉ सोमनाथ कदम हे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम कसाल येथील सुहासिनी मंगल कार्यालय येथे संपन्न होणार असून यावेळी संस्थेच्यावतीने आयोजित पाच राज्यस्तरीय मानाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. हे पुरस्कार शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला – क्रीडा, सहकार या विभागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या रोहिदास समाजातील बांधवाना देऊन सन्मानित करण्यात येते.
तसेच संस्थेच्या वतीने सेवानिवृत्त सैनिक, अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, गटई कामगार, विविध स्पर्धा आणि शालेय परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ करण्यात येणार असून संस्थेने गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या उपक्रमांचा लेखाजोखा असलेली स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी रोहिदास समाजासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक संचालक आणि पदाधिकारी तसेच कोल्हापूर, मुंबई, पुणे, सोलापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी इत्यादी जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम रोहिदास बांधवानी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थेचे संस्थापक राज्यसरचिटणीस प्रसाद मसुरकर यांनी केले आहे.
