अरबी समुद्रातील सुमारे ८० सागरी मैलाचा जलप्रवास अवघ्या १९ तास २३ मिनिटात केला पूर्ण …
मालवण दि प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गड किल्ल्याबाबत कमालीची निष्ठा आणि आदर बाळगणाऱ्या कोल्हापूर शाहूपुरी येथील १४ वर्षीय जलतरणपटू गुरुप्रसाद विनोद मोरे याने छत्रपतीची सागरी राजधानी असणाऱ्या किल्ले सिंधुदुर्ग पासून किल्ले विजयदुर्ग पर्यंतचा अरबी समुद्रातील सुमारे ८० सागरी मैलांचा जलप्रवास सुमारे १९ तास २३ मिनिटांत पूर्ण करून एक विक्रम नोंदविला बुधवारी रात्री नऊ वाजता सुरू केलेली जलप्रवासाची ही कामगिरी दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल गुरुवारी दुपारी चार वाजून २३ मिनिटांच्या सुमारास फत्ते केल्यानंतर विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी त्याचे जल्लोषी स्वागत करण्यात आले . मालवणच्या किल्ले सिंधुदुर्ग ते किल्ले विजयदुर्ग असा सागरी प्रवास १४ वर्षीय मुलाने पूर्णत्वास नेऊन साहसाचे दर्शन घडविले.
यापूर्वी १६ डिसेंबरला वाघोटण खाडीत झालेल्या जलतरण स्पर्धेत गुरुप्रसादने तृतीय क्रमांक पटकाविला होता. या वेळी त्याने मालवण ते विजयदुर्ग असा सागरी प्रवास न थांबता पूर्ण करून साहसाची नोंद केली, कोल्हापूर येथील ‘जीम्स स्विमिंग अॅकॅडमी’चे प्रशिक्षक अजय पाठक यांच्या माहितीनुसार, गुरुप्रसाद मागील तीन वर्षांपासून सराव करीत होता. छोट्या-छोट्या सरावानंतर त्याने सागरी अंतर पूर्ण करण्याचा मनोदय केला. राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने ही मोहीम आखण्यात आली. त्यानुसार बुधवारी रात्री नऊ वाजता मालवण येथून मोहिमेचा प्रारंभ झाला. यावेळी विविध लोकप्रतिनिधींसह जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर उपस्थित होते.
मोहिमेत प्रशिक्षक अजय पाठक यांच्यासह गुरुप्रसादचे प्रशिक्षक नीळकंठ आखाडे, वडील विनोद मोरे,उद्योजक डॉ दीपक परब बाबा परब हे उपस्थित होते. गुरुप्रसादचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्याचे मनोबल उंचावण्यासाठी साऱ्यांनी प्रयत्न केले गुरुप्रसाद च्या या धाडसी मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे
