मालवण ता.२०-:* भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मालवण व महापुरुष रेवतळे मालवणच्या वतीने निमंत्रित संघाच्या छत्रपती चषक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शिवभवानी सावंतवाडी संघाला पराभूत करत महापुरुष रेवतळे मालवण संघाने विजेतेपद पटकावले. शिव भवानी सावंतवाडी संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
महापुरुष रेवतळे मालवण संघाचा खेळाडू ललित चव्हाण याला स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. मालवण येथील टोपीवाला बोर्डिंग मैदानावर आयोजित या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मालवण एज्युकेशन सोसायटीचे दिगंबर सामंत यांच्या हस्ते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस सुदेश आचरेकर यांच्या हस्ते हार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक दीपक पाटकर, विजय केनवडेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, महेश सारंग, राजू बिडये, उत्तम पेडणेकर, रामभाऊ पेडणेकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी माजी खासदार निलेश राणे, बाबा परब, दत्ता सामंत यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना महापुरुष रेवतळे मालवण विरुद्ध गुढीपुर पिंगुळी यांच्यात झाला.
यामध्ये महापुरुष रेवतळे संघाने २२ विरुद्ध ८ अशा एकतर्फी गुणांनी गुढीपुर पिंगुळी संघावर विजय मिळवला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात शिव भवानी सावंतवाडी संघाने १३ विरुद्ध ११ फरकाने पंचक्रोशी फोंडा संघावर विजय मिळवला. रेवतळे महापुरुष विरुद्ध शिव भवानी सावंतवाडी यांच्यात रंगलेल्या अंतिम सामन्यात महापुरुष रेवतळे संघाने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपले वर्चस्व कायम ठेवत १७ विरुद्ध १२ अशा फरकाने विजय मिळवीत विजेते पदावर आपले नाव कोरले. यामध्ये ललित चव्हाण, जतीन कांबळी, मिथिल हिंदळेकर यांनी भरीव अशी कामगिरी केली व त्यांना बंटी मांजरेकर, मंदार आंबेरकर यांची साथ लाभली. विजेत्या रेवतळे संघास रुपये १५ हजार व चषक तर उपविजेत्या सावंतवाडी संघास रुपये १० हजार व चषक देऊन गौरविण्यात आले.
तर उपांत्य सामन्यात पराभूत संघ गुढीपुर पिंगुळी व पंचक्रोशी फोंडा यांनाही पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेत उत्कृष्ट पकड- वासीम शेख (शिव भवानी सावंतवाडी) उत्कृष्ट चढाई- वेदांत हरमलकर (शिव भवानी सावंतवाडी) यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत समालोचन अजय शिंदे, अजित मार्गी यांनी केले तर गुणलेखनाचे काम मंदार ओरसकर, लक्ष्मी, तन्वी चव्हाण, नेहा सैनी यांनी केले. नितीन हडकर, रेनॉल्ड भुतेलो, सौगंधराज बादेकर, हरी चव्हाण, रुपेश खोबरेकर, महापुरुष रेवतळे मित्रमंडळ, महापुरुष रेवतळे कबड्डी संघ व भाजप युवा मोर्चा मालवण यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली
