वेंगुर्ला फिशिंग व्हीलेज फेस्टिव्हल’ मार्चमध्ये

वेंगुर्ला ता.१९-:* जिल्ह्यातील मालवण हा पर्यटन तालुका म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. वेंगुर्ले तालुक्याचाही पर्यटन तालुका म्हणून ओळख व्हावी, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वेंगुर्ले न. प. आणि उभादांडा ग्रा. पं. यांच्या संयुक्त विद्यमाने मार्चमध्ये नवाबाग येथे ‘वेंगुर्ले फिशिंग व्हिलेज फेस्टिव्हल’ या नावाने महोत्सव घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली.

यावेळी त्यांनी या महोत्सवाच्या नियोजनासाठी स्थानिक संस्थाचे अधिकारी पदाधिकारी व सेवाभावी संस्था मंडळाचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. आमदार दीपक केसरकर यांनी नवाबाग येथील झुलता पूल येथे भेट देऊन सदरच्या कामाची पाहणी केली. तसेच त्यानंतर वेंगुर्ले न.प. सभागृहात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वेंगुर्ले न. प., आणि उभादांडा ग्रा. पं. यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या, वेंगुर्ले फिशिंग व्हिलेज फेस्टिव्हल संदर्भात नागरिकांशी चर्चा केली. यावेळी वेंगुर्ले माजी नगराध्यक्ष दिलिप गिरप, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कोकण विभाग रिजनल ऑफिसर हेगडे, वेंगुर्ले नायब तहसीलदार फोवकांडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, माजी उपनगराध्यक्षा शीतल आंगचेकर, प्रशांत आपटे, संदेश निकम, कृपा गिरप, श्वेता हुले, मच्छीमार सोसायटीचे राजेंद्र कुबल, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, शिवसेना महिला संघटक सुकन्या नरसुले, ‘माझा वेंगुर्ले’चे कपिल पोकळे, सुनील नांदोस्कर आदी उपस्थित होते.

केसरकर पुढे म्हणाले की वेंगुर्ले नावाबाग येथे लवकरच फिशिंग व्हिलेज होणार आहे. नवाबाग बंदर जोणाऱ्या झुलत्या पूलाचे कामही लवकरच पूर्ण होईल. मालवणप्रमाणेच वेंगुर्ले तालुका हा पर्यटन नकाशावर यावा यासाठी आपण या महोत्सवासाठी वेंगुर्ले तालुक्याची निवड केली आहे. येथे यापूर्वी आपण बीच कबड्डी स्पर्धा घेतल्या होत्या. वेंगुर्ले फिशिंग व्हिलेज फेस्टिव्हल या नावाने हा फेस्टिव्हल होणार आहे. निधी उपलब्ध करुन देणार! वेंगुर्ले बंदर व नवाबाग जोणाऱ्या झुलत्या पूलाचे काम पूर्ण न झाल्याने येथे तात्पुरता पूल उभारावा लागणार आहे. तसेच होड्या भाड्याने घेऊन पर्यटकांची सोय करावी लागणार आहे.

आपण पालकमंत्री उदय सामंत तसेच इतर संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन या फेस्टिव्हलसाठी निधी उपलब्ध करुन देईन. येथील स्थानिक लोकप्रतिनिधी, संस्था, सामाजिक संस्था मंडळे यांनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन श्री केसरकर यांनी केले. तसेच या फेस्टिव्हल संदर्भात काही सूचना असल्यास त्या मांडाव्यात असे सांगितले. फेस्टिव्हल मे मध्ये घेण्याची मागणी सर्व परीक्षा या मार्च महिन्यात संपतात. परीक्षा संपल्यानंतर पर्यटक हे आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी बाहेर पडतात.

त्यामुळे हा फेस्टिव्हल मार्चमध्ये न घेता तो मे मध्ये घेण्यात यावा, पर्यटकांना फिरण्यासाठी होड्यांची सोय करावी, वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी डिशचे स्टॉल लावण्यात यावेत, वेंगुर्ले तालुक्याला ऐतिहासिक महत्व आहे. त्यामुळे या फेस्टिव्हलमध्ये येथील ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारे फलक लावण्यात यावेत, हा फेस्टिव्हल केवळ निधी खर्च करण्याकरीता न करता येथे जास्तीत-जास्त पर्यटक यावेत यादृष्टीने प्रयत्न व्हावा, नवाबाग हा ग्रामीण भागात येतो.

त्यामुळे तेथे हद्दीचा व फंडिंगचा विषय येतो त्यामुळे त्याचाही विचार व्हावा, अशा सूचना यावेळी सुनील नांदोस्कर, कपिल पोकळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, प्रशांत आपटे, दिलीप गिरप यांनी मांडल्या. स्वतंत्र कमिटी करणार! फिल्म फेस्टिव्हल, फिशिंग व्हिलेज फेस्टिव्हलच्या तारखा निश्चित असतात. ज्या काळात पर्यटक कमी असतात, त्याच काळात अशा प्रकारचे फेस्टिव्हल आयोजित केले जातात. त्यामुळे हा फेस्टिव्हल मार्चच्या तिसऱ्या आठवड्यातच होईल. त्यासाठी वेंगुर्ले शहर व नवाबाग अशी स्वतंत्र कमिटी केली जाईल. या कमिटीमध्ये शासकीय अधिकारी ही असतील. इतर नियोजना संदर्भात स्वतंत्र्य बैठका घेण्यात येतील असेही नियोजन करण्यात आले.

You cannot copy content of this page