वेंगुर्ल्यातील बॅ. नाथ पै स्मारकासाठी १ कोटी ७० लाख मंजूर

आमदार दीपक केसरकर यांची माहिती : बॅ. नाथ पै जन्मशताब्दीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर: ५० महिलांनी घेतला लाभ

वेंगुर्ला ता.१९-:* भारताच्या इतिहासात आजपर्यंत जे चांगले संसदपटू झाले त्यात बॅ. नाथ पै हे अग्रणी नाव आहे. त्यांचे शालेय शिक्षण येथीत ज्या वेंगुर्ले नं. १ मध्ये झाले तेथे त्यांचे स्मारक व्हावे यासाठी १ कोटी ७० लाख मंजूर झाले आहेत. या स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यानी वेंगुर्ला येथे केले.

बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले, बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग व नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय येथे मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी आमदार केसरकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल मुळे, आर्किटेक्ट अमित कामत, प्रकाश गडेकर, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य इर्शाद शेख, डॉ. राजेश्वर उबाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आश्विनी माईणकर-सामंत, डॉ माने, उमेश गाळवणकर, डॉ. शेटकर, डॉ. आदेश पालयेकर व नाथ पै फाउंडेशनच्या अदिती पै आदी मान्यवर उपस्थित होते. केसरकर पुढे म्हणाले, वेंगुर्ले येथील उपजिल्हा रुग्णालयास आता मंजुरी मिळाली आहे. या हॉस्पिटलसाठी ९० टक्के फर्निचर मी उपलब्ध करून दिले. वेंगुर्ल्याचे दुसरे एक सुपुत्र डॉ. कोटणीस त्यांच्या नावे कोरानानंतर येथे एक कक्ष व्हावा अशी आपली इच्छा आहे. त्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा. आपण तो मंजूर करून घेईन, असेही त्यांनी सांगितले.

पै यांचे निधन होवून ५१ वर्षे झाली तरीही अजूनही येथील लोक त्यांचे ऋण व्यक्त करतात. नाथ पै यांचे वेंगुर्ला हे जन्म गाव असल्याने फाउंडेशनतर्फे येथे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. असे अदिती पै यांनी सांगितले. आपण लहान असताना बॅ. नाथ पै यांना प्रत्यक्ष पाण्याचा व त्यांचे भाषण ऐकण्याचा योग आला होता. त्यांचे भाषण म्हणजे एक वेगळीच उर्जा होती. असे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप म्हणाले. यावेळी श्रीपाद पाटील, सुनील डुबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार सचिन वालावलकर यांनी मानले. शिबिरात ५० महिलांची तपासणी करण्यात आली.

You cannot copy content of this page