सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या ठाणे येथील कल्पेश रमेश मारळे (३३) याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर बी रोटे यांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. कुडाळ तालुक्यातील एका महिलेला कणकवली येथे भेटायला ये असे सांगून संबंधित संशयित आरोपीने बोलवून घेतले होते. मात्र तिला कुडाळ कणकवली दरम्यानच्या एका गावात भेटत फ्रेश होण्याच्या बहाण्याने एका लॉजवर नेले. त्या ठिकाणी त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. १८ नोव्हेंबर २०२० रोजी घडलेल्या घटनेची तक्रार १५ डिसेंबर २०२० रोजी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार संशयितांवर भा. द.वी. कलम ३७६ (१), ३७६ (२) (फ), ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. २६ डिसेंबर रोजी संशयिताला ठाणे येथील त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. तर त्यांनतर त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली होती. दरम्यान त्याने जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. यावरील सुनावणीत त्याच्यावर महिलांच्या बाबतीत गंभीर गुन्हा नोंद असून पीडित व साक्षीदार यांना धमकावण्याची शक्यता आहे. तो परजिल्ह्यातील असल्याची बाबही न्यायालयाच्या निदर्शनास सरकार पक्षाकडून आणून देण्यात आली.
अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीचा जामीन न्यायलयाने फेटाळला
