उपाध्यक्ष म्हापसेकर यांचे मंत्री सुनील केदार यांना निवेदन
सिंधुदुर्गनगरी ता १७ -:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत आदेश व्हावेत. अशी मागणी जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी पशुसवर्धन दुग्धविकास, क्रीड़ा मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मंत्री सुनील केदार याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणात पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांची रिक्त पदे आहेत. रिक्त पदांमुळे पशुधनावर वेळीच उपचार होत नाहीत .काही वेळा उपचाराअभावी जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. अपु-या अधिकारी , कर्मचारी संख्येमुळे काम करणाऱ्या या विभागातील अधिकारी,कर्मचारी यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. यावर वेळीच उपाय योजना न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. रिक्त पदांमुळे लसीकरण, विविध योजना राबविताना खूपच अडचणी निर्माण होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडील पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील रिक्त पदांची संख्या मोठी आहे. यामध्ये पशुधन विकास अधिकारी २५ मंजूर, १२ भरली, १३ रिक्त, (५२ टक्के) पशुधन पर्यवेक्षक ६१ मंजूर, ३६ भरली, २५ रिक्त,(४१ टक्के) अशी एकुण ३८ पदे रिक्त आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत पशुधन विकास अधिकारी यांची रिक्त पदे भरण्याबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी. तसेच पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्याबाबत संबंधित विभागास आदेश द्यावेत. अशी विनंती राजेंद्र म्हापसेकर यांनी निवेदनातून केली आहे.
