पशु दवाखान्यांचे टाईप प्लॅन बदला

राजेंद्र म्हापसेकर यांची मंत्री केदार यांच्याकडे मागणी

सिंधुदुर्गनगरी ता १७ -:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुवैद्यकिय दवाखाना इमारत बांधकाम मंजूर आराखड्यामध्ये (टाईप प्लान) बदल करुन मिळावा. अशी मागणी जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिनस्त पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-१ साठी खात्याने इमारत बांधकामाचा सुमारे ३५०० चौ.फु. आकारमानाचा जी+१ पध्दतीचा आराखडा मंजूर केलेला आहे.

मात्र पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-२ च्या इमारतीसाठी आराखडा मंजूर केलेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण ७७ पशुवैद्यकिय संस्था असून पशुधन विकास अधिकारी संचलित श्रेणी -१ च्या १७ संस्था असून उर्वरित श्रेणी-२ च्या ५० संस्था या सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक संचलित आहेत. पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-२ साठी मंजूर आकृतीबंध, इमारतीवरील देखभाल व दुरुस्त तसेच दवाखाना इमारत बांधकामासाठी आवश्यक जागेचा विचार करता खात्याने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार नवीन इमारत बांधकाम करण्याची आवश्यकता नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने प्लाट स्लाब पध्दतीने केलेल्या इमारत बांधकामावर उतरते छप्पर नसल्याने काही कालावधीतच नवीन इमारतीला गळती सुरु होते. त्यामुळे इमारतीवर पत्र्याच्या छप्परासह उतरत्या छप्पराचे बांधकाम आणि आवश्यक त्या सुविधेसह जी+१ पध्दतीचा सुमारे १४०० ते १५०० चौ.फु. एवढ्या मध्यम आकारमानाचा पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-२ इमारत बांधकामाचा आराखडा (टाईप प्लान) शासन स्तरावरुन मंजूर होऊन मिळावे . अशी मागणी जि प उपाध्यक्ष तथा पशुसवर्धन समिती सभापती राजेंद्र म्हापसेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page