चेतन चव्हाण यांनी कसई दोडामार्ग नगरपंचायतीचा पदभार स्वीकारला

दोडामार्ग ता.१७ सुमित दळवी-:* राजकीय घडामोडी आणि नाट्यमय घटनानी रंगलेल्या कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार किंगमेकर ठरलेल्या चेतन चव्हाण आणि उपनगराध्यक्ष देविदास गवस यांनी स्वीकारला.सर्वप्रथम पदभार स्वीकारण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी पत्रकारांशी बोलताना नूतन नगराध्यक्ष चेतन चव्हाण म्हणाले,जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन विकासाचा पारदर्शी कारभार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पत्रकारांनी सत्ता येऊनही तालुका कार्यकारिणी का बरखास्त करण्यात आली या प्रश्नावर ते म्हणाले,नगर पंचायतीवर भाजपची सत्ता आली.नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष भाजपचा बसावा ही वरिष्ठांची सूचना होती.त्यानुसार नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवड झाली.त्यामुळे नगर पंचायत निवडणूक हे कार्यकारिणी बरखास्तीचे कारण नाही.मात्र जे काही कारण आहे ते आपण पत्रकारांना यावेळी सांगू शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान मागच्या नगर पंचायतीच्या काळात ज्यांच्यावर अपहार केल्याचे आरोप झालेत त्यांच्यावर कोणती कारवाई करणार?असे विचारले असता चेतन चव्हाण यांनी आपण यात तात्काळ लक्ष घालणार आहे.जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार केली जाईल.कारण हा जनतेचा पैसा आहे,तो खाण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचेही चेतन चव्हाण यांनी स्पष्ट केले.

यावेळी नगरसेवक तथा गटनेते नितीन मणेरीकर, उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण,सीईओ शिवराज गायकवाड यांच्यासह नगरसेवक,युवा उद्योजक शैलेश दळवी,समीर रेडकर,खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर,कोनाळ सरपंच पराशर सावंत,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दीपक गवस,संजय सातार्डेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page