पशुसंवर्धन, दुग्धविकासचे पारंपारीक धोरण बदलण्याचा प्रयत्न

मंत्री सुनील केदार यांचे प्रतिपादन;ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या ‘समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पा’चे केले उदघाटन

ओरोस ता.१७-:पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचा पदभार घेतल्यानंतर या दोन्ही विभागाच्या पारंपारिक व्यवसायात बदल करण्याचे धोरण आम्ही स्वीकारले आहे. सर्वाधिक उपयुक्त व जास्त दूध देणारी गिर गाय आम्हाला विकसित करून तर जास्तीत जास्त वजन असलेले शेळी-मेंढी आम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना द्यायचे आहे. यासाठी संशोधन सुरू आहे. यासाठी केंद्र सरकारकडे आमचा पाठपुरावा सुरु आहे, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी किर्लोस कृषी विज्ञान केंद्राच्या “समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्प” उदघाटन प्रसंगी बोलताना छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, ओरोस येथे बोलताना केले.

मंत्री केदार हे गुरुवारी एक दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठाण संचलित किर्लोस कृषी विज्ञान केंद्र व छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय यांच्यावतीने “समृध्द आणि आनंदी गाव प्रकल्प” सुरू करण्यात आला आहे. याचे उदघाटन मंत्री केदार यांनी केले. यावेळी कृषी प्रतिष्ठाण अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, आ दीपक केसरकर, आ वैभव नाईक, कर्नल विनीत कुमार, राज्य पशुसंवर्धन आयुक्त डॉ रवींद्र दळवी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, प्रकाश जैतापकर, बाळू अंधारी, प्रदीप सावंत, श्रीकृष्ण तळवडेकर, प्रतिष्ठाण सचिव सावंत, विजय शिंदे डॉ काजरेकर, प्रा विलास सावंत, प्रा स्नेहा सामंत यांच्यासह शेतकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page