काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात समीक्षक डॉ. रमेश साळुंखे यांचे प्रतिपादन*
कणकवली 17 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- आजच्या अस्वस्थ काळात सर्वच क्षेत्रातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कधी नव्हे इतका घाला घातला गेला आहे. या पार्श्वभूमीवर कवी रमेश सावंत हे ‘मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो’ या कवितासंग्रहा मधील कवितांमधून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित करतात. आजच्या असुरक्षिततेच्या कालखंडात जगत असताना दडपशाहीच्या विरोधात या कवितांच्या मध्यमातून ते आवाज उठवीतात. अशा धोकादायक स्थितीतही निराश न होता ठामपणे आपली भूमिका मांडणारे सावंत निराशावादी नाहीत ही आश्वासक गोष्ट आहे असे प्रतिपादन नामवंत समीक्षक डॉ रमेश साळुंखे (कोल्हापूर ) यांनी केले सिंधुदुर्गातील ज्येष्ठ कवी रमेश सावंत यांच्या मी देशाचा सातबारा लिहिणे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. साळुंखे यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
तरुण समीक्षक प्रा.जिजा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात कवयित्री प्रा.नीलम यादव, कवयित्री प्रमिता तांबे, कवी विजय सावंत यांनी ‘मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो’ या संग्रहावर भाष्य केले. यावेळी समाज साहित्य संघटनेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, उपाध्यक्ष प्रा.मनीषा पाटील, विश्वस्त वैभव साटम तसेच इतर पदाधिकारी ऍड.मेघना सावंत प्रा.प्रियदर्शनी पारकर, प्रा.तुषार नेवरेकर आदी उपस्थित होते.
प्रा.शिंदे म्हणाले, रमेश सावंत यांच्या सदर काव्यसंग्रहातून पाच आशय सूत्रे मांडता येतील. एक बिघडत जाणारी समाज व्यवस्था, त्यातून बदलत जाणारी खेडी, इथला निसर्ग, राजकीय हस्तक्षेप आणि बदलणारी अर्थव्यवस्था यामुळे काळाच्या एका विशिष्ठ कचाट्यात सापडलेल्या माणसाची ही कविता प्रतिनिधित्व करताना आढळते. बिघडत जाणाऱ्या व्यवस्थेत सामान्य माणूस कसा तग धरू पहातो हे सावंत एका पटलावर सांगत असताना काळाचा उलट प्रवाह फार वेगाने होत आहे.त्यामुळे माणूस, निसर्ग आणि राजकीय प्रवाह यांचे एकंदरीत नाते किती बदलते आहे हेच सावंत यांची कविता अधोरेखित करते.
प्रा.यादव म्हणाल्या, ‘देशाचा सातबारा लिहीन म्हणतो!’ या वेगळ्या शीर्षकाच्या संग्रहामधील समग्र कविता ही आजच्या निर्वानीच्या काळाची कविता आहे.ती नेमकी समजून घेतली की आजच जगणं किती भयंकर आहे हे लक्षात येते.म्हणूनच ही कविता वाचकाला आजच्या काळाच भान आणून देण्यात यशस्वी झाली आहे, असे आपण खात्रीने म्हणू शकतो!
श्रीमती तांबे म्हणाल्या , सामाजिक विस्कटलेपणाचा लेखाजोखा मांडणारे कवी सावंत स्वतःलाही वारंवार तपासत असल्याचे या संग्रहातील कवितांमधून जाणवते. नातेसंबंधातला कोरडेपणा, सामाजिक मूल्यांना लागलेली उतरती कळा, सामाजिक स्तरीकरण, धार्मिक तेढ आणि अस्मितांचा आक्रस्ताळेपणा या सर्वांवरच कवी सावंत यांनी लेखणीचा आसूड ओढला आहे.’ प्रखर सामाजिक जाणिवा ‘ हा या कवितांचा गाभा आहे. प्रास्ताविक श्री मातोंडकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.साटम यांनी केले.मनीषा पाटील यांनी आभार मानले.
