मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न केल्याबद्दल वैद्यकीय मंत्री अमित विलासराव देशमुख यांचे युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी भेट घेत आभार मानले. राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दादर येथील टिळक भवन येथे २०१९ च्या विधानसभा उमेदवार यांची आढावा बैठक आयोजित केली होती.
या आढावा बैठकीत अरविंद मोंडकर यांनी वैद्यकीय मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. कुडाळ विधानसभा मतदारसंघात ओरोस येथे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सोयीस्कर व्हावं म्हणून वैद्यकीय महाविद्यालय होणे गरजेचे होते असे मोंडकर यांनी सांगत या महाविद्यालयासाठी महत्वपूर्ण प्रयत्न केल्याबद्दल मंत्री देशमुख यांचे आभार मानले. यावेळी मंत्री ना. देशमुख यांनी आपण लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असल्याचे सांगितल्याची माहिती मोंडकर यांनी दिली आहे.
