कणकवली ता.१०-:* “आप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली” येथे दशावतारी राजा नटसम्राट सुधीर कलिंगण यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ, आपण आहात म्हणून आम्ही, ॐ नमो भगवते भालचंद्राय तसेच पोलीस दलाच्यावतीने श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सिंधुदुर्गातील दशावतारातील लोकराजा सुधीर कलिंगण यांची” एक्झिट ” हे अतिशय वेदनादायक आहे. परंपरागत “दशावतार नाट्य मंडळाच्या” दुसऱ्या पिढीतील कलाकारांना आपण मुकलो आहोत. राज्य परिवहन सेवेत चालक म्हणून सेवा बजावताना ही त्यांनी आपल्यातील कलाकार जिवंत ठेवला. हे सर्व करत असताना प्रकृती कडे केलेल्या दुर्लक्षामुळे त्यांचे अकाली निधन झाले, ही एक प्रकारे आपल्या समाजाचीच चुक आहे.प्रत्येक कलाकाराला आपण सर्वतोपरी सहाय्य करुन लोककला जगवल्या पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी केले, जेष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर म्हणाले की आमच्या लहानपणापासून रात्री राजा सकाळी डोक्यावर बोजा हे आम्ही ऐकतोय, पहातोय यामध्ये बदल व्हायला पाहिजे, तरच लोककला टिकतील. सुधीर कलिंगण यांचे सोबत काम केलेले रिक्षा व्यावसायिक संजय झगडे यांनी लोकराजाच्या कामाचे व कलाकाराचे यथार्थ चित्रण करून दोनचार प्रसंगातील कसोटीला नटसम्राट सुधीर कसा उतरला हे विषद केले.
कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर म्हणाले की, मी आजपर्यंत दशावतार पाहिलेला नाही, परंतु सुधीर कलिंगण यांचे बाबतीत प्रसिध्द झालेले लेखन व अन्य वक्त्यांनी केलेले वर्णन ऐकल्यावर माझी उत्सुकता जागृत झाली आहे.असे म्हणाले.
पत्रकार विजय गावकर म्हणाले, सुधीरची रंगमंचावरील सहज अभिनयाची पध्दत पाहता व त्यांच्यात संचारलेली भुमिका विचारात घेता, दुसरा “राजा” आता होणार नाही, अशी मला भिती वाटत आहे. दशावतारी अजिंक्य तारा-लोकराजा- नटसम्राट-सिंधु रत्न तुम्ही, अलोट लोटला जनसागर तुमच्या यात्रेस, डोळे पाणावले प्रत्येकाचे, नाही अपवाद कोणी, झाले बहु होतील बहु परंतु या सम हाच, परी राहीलास तु अजिंक्य तारा रंगपटलावरती, अशा शब्दांत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आदरांजली अर्पण केली.
