मालवण ता.०९-:* मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी फक्त विरोधाला विरोध करण्याच्या वृत्तीने स्वतःच्या स्वार्थासाठी नगरपालिकेत पाच वर्षे मालवणच्या विकासाला खीळ घालण्याचे काम केले. ज्या पक्षातून निवडून आले त्याच पक्षाच्या विरोधात काम करणे आणि लोकोपयोगी कामे बंद करणे या एक कलमी कार्यक्रमात वराडकर यांनी आपली राजकीय कारकीर्द फुकट घालवली. २०११ ते २०१६ या कालावधीत तत्कालीन उपनगराध्यक्षांच्या चुकीच्या नियोजनामुळे बंद पडलेली भुयारी गटार योजना आम्ही सत्तेत आल्यावर सुरू करण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे भुयारी गटार योजना पूर्ण करण्यात कोण अपयशी ठरले याचे आत्मपरीक्षण राजन वराडकर यांनी करावे अशी टीका नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. मालवण शहरातील भुयारी गटार योजना पूर्ण करण्यात नगराध्यक्ष महेश कांदळगावकर हे अपयशी ठरल्याची टीका उपनगराध्यक्ष राजन वराडकर व नगरसेवक गणेश कुशे यांनी पत्रकार परिषदेतून केली होती.
त्यावर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून वराडकर व कुशे यांना प्रत्युत्तर दिले आहे. २०११- २०१६ या पाच वर्षांच्या कालावधीत तत्कालीन उपनगराध्यक्ष यांच्या चुकीच्या नियोजनामुळे बंद पडलेली भुयारी गटर योजना आम्ही सत्तेत आल्यानंतर आमच्या आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्या कडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेऊन ती सुरू करण्याचा प्रयत्न करत केला. त्यामुळे अपयशी कोण ठरले होते याचे आत्मपरीक्षण उपनगराध्यक्ष वराडकर यांनी करावे. आपल्या सोयीप्रमाणे आमदारांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढून वराडकर यांनी स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये. मागच्या २ वर्षा पासून कोरोना कालावधीत अडचणीमुळे या कामाची म्हणावी तशी प्रगती झाली नाही ही वस्तुतिथी आहे,
तरी ही योजना पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आता अचानक वराडकर यांच्याच काळातील मर्जीतील ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा मुद्दा का आला ? या मागच कुठलं ‘कारण’ आहे हे पण एक कोडे आहे. आमच्या कालावधीत या ठेकेदाराला दिलेली बिले ही भुयारी गटर साठी प्राप्त निधीतून दिली आहेत. जर ती चुकीच्या पद्धतीने दिली असतील तर तशी तक्रार वराडकर यांनी शासन दरबारी करावी. पण याच वेळी वराडकर यांच्या कालावधीत याच ठेकेदारांची बिले भुयारी गटारचा निधी नसल्याने कर्मचारी यांच्यासाठी राखीव निधीतून कुणाचीही परवानगी न घेता दिली गेली यामागचे ‘कारण’ पण वराडकर यांनी योग्य ‘अर्थ’ काढून स्पष्ट करावे.आपल्या अर्थकारणाला आमच्या कालावधीत चाफ बसल्याने वराडकर हे वारंवार विकास कामात अडथळा आणत आहेत अशी टीका महेश कांदळगावकर यांनी केली आहे.
नगरपालिका इमारत परिसराचे सुशोभीकरण करताना केलेल्या आराखड्यात लगतच्या जोशी कुटुंबीय यांच्या गडग्याच्या बाजूने जाणारा अंतर्गत रस्ता अन्य ठिकाणाहून नेण्यात यावा अशी विनंती जोशी यांनी नगरपालिकेला केल्याने केल्यामुळे तो रस्ता रद्द करण्यात आला. नगरपालिकेच्या अंतर्गत रस्त्यामुळे आमचा फायदा झाला हा कुठला जावईशोध लावला हे कायम फायदा बघणारे वराडकर आणि कुशे हेच सांगू शकतील, असा टोला कांदळगावकर यांनी लगावला आहे. आमच्या फायद्याचे टेंडर मंजूर केले असे वराडकर म्हणत असतील तर हे टेंडर १० टक्के कमी दराने मंजूर केले आहे याची पण माहिती वराडकर यांनी घ्यावी. आपल्या मर्जीतील ठेकेदाराला हे टेंडर न मिळाल्याने आणि आम्ही मंजूर केलेले टेंडर १० टक्के कमी दराचे असल्याने या ठेकेदाराला त्रास देण्याच्या दृष्टीने असे खोटे नाटे आरोप वराडकर – कुशे द्वयी कडून होत आहेत. मालवणच्या खेळाडूंसाठी धुरीवाडा साईमंदिर नजीक कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाकडून ९९ वर्षासाठी लीज वर घेतलेल्या जागेतील स्पोर्ट्स कॉम्लेक्स मधील स्विमिंग पूल पूल आणि बॅडमिंटन हॉलचे काम बंद पाडून खेळाडूंचे नुकसान करण्याचे कामही वराडकर यांनी केले आहे, अशी टीकाही कांदळगावकर यांनी केली आहे.
