प्रा. गोविंद काजरेकर यांचे ऑनलाईन व्याख्यानात प्रतिपादन
सावंतवाडी ता.०९-:* दशावतार हा सोळाव्या शतकाच्या आधीपासून कोकणामध्ये चालू आहे तसा उल्लेख रामदास स्वामींनी आपल्या दासबोधामध्ये केला आहे परंतु अठराव्या शतकाच्या सुरवातीला कर्नाटकमधून आलेले श्यामजी नाईक काळे, एक कीर्तनकार, कथाकार यांनी आत्ताच्या पद्धतीतील दशावतार त्या काळामध्ये सुरू केला ज्यामध्ये पूर्वरंग व उत्तररंग अशा दोन विभागांमध्ये हा सादर केला कर्नाटकातील यक्षगान प्रमाणे कोकणामध्ये दशावताराचे स्वरूप असते असे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले गोगटे वाळके कॉलेज बांदा चे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर हे दशावतार संकल्पना स्वरूप व महत्त्व या विषयावर ऑनलाईन व्याख्यानात बोलताना म्हणाले
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल, महाविद्यालयाच्या आयक्यूएसी चे चेअरमन डॉ बी एन हिरामणी, डॉ.एस एम बुवा, महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग विद्यार्थी तसेच मुंबई विद्यापीठअंतर्गत विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक विद्यार्थी या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी कला व सांस्कृतिक विभाग तसेच आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दशावतार संकल्पना स्वरूप व महत्त्व या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गोगटे वाळके कॉलेज बांदा चे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर हे होते
डॉ. गोविंद काजरेकर पुढे म्हणाले पूर्व रंगामध्ये संकासूर गणपत, ब्रह्मदेव, रिद्धी सिद्धी , सरस्वती मयूरावर बसून येणे व मयुर नृत्य करणे, त्याचबरोबर संकासुर देवांचे वेद चोरून तो समुद्राखाली लपून बसतो व शेवटी विष्णू अवतार धारण करून ते चोरलेले वेद घेऊन परत येतो अशा प्रकारे पूर्वरंग संपतो उत्तर रंगामध्ये पुराणातील आख्यान कथा दाखवली जाते. या मौखिक स्वरुपातील नाटकांमध्ये सामाजिक नीतिमत्ता, सत्यवचन ‘पूर्वजांचा सन्मान शेवटी दुष्टांचा नि: पात व सत्याचा विजय अशाप्रकारे या कथानकामध्ये उत्तमप्रकारे नाट्यनिर्मिती केली केली जाते. पूर्वी फक्त पौराणिक कथा सादर केल्या जात असायचा आता ही नाटके संत चरित्रावर, साधूचरित्रावर होताना दिसतात .
दशावतारचे वैशिष्ट्य म्हणजे दशावतारातील पात्रे मोठमोठ्या आवाजात बोलतात. चेहऱ्यावर गडद रंगांचा मेकअप करतात पूर्वीच्या काळी पेट्रो मॅक्स किंवा कमी उजेडामुळे नाटके होत असल्यामुळे गडद रंग वापरले जायचे ती प्रथा इलेक्ट्रिसिटीचा जमाना आला तरी तशीच कायम आहे लाऊड स्पीकर जरी वापर केला जात असला तरी आवाजाचा उंच पोत तोच आहे अशी ही संपूर्ण कोकणातली विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा येथे सातत्याने जत्रोत्सव यामध्ये मंदिरात ही परंपरा आजही अनेक कलाकारांच्या माध्यमातून जिल्ह्यांमध्ये संवर्धित केलेली आहे. दशवतारात संदर्भात माहिती देणारं एकही प्रशिक्षण केंद्र जिल्ह्यामध्ये नाही त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दशावताराचे प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यास याचा नवीन पिढीला निश्चितच लाभ होईल असे ते म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ एस एम बुवा यांनी केले
