निकृष्ट कामाचे मुख्यमंत्र्यांना फोटो पाठविणार

अनिल चव्हाण यांचा इशारा;ओवळीची मोरी रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी

आंबोली ता.०९-:* येथील गावठण-फौजदारवाडी ते ओवळीची मोरी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून संबंधित कामाचे फोटो मुख्यमंत्री, बांधकाममंत्री व मुख्य सचिव यांना आम्ही पाठवणार आहोत. त्यामुळे ठेकेदाराने तात्काळ कामाचा दर्जा सुधारावा, असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी दिला आहे.

याबाबत चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री सडक योजनेतून येथील गावठण फौजदारवाडी ते ओवळीची मोरी या रस्त्याचे काम चालू आहे. मात्र या रस्त्याचे बोगस काम झाले असून याला जबाबदार कोण? हा रस्ता जनतेच्या पैशाची लूट करून फक्त ठेकेदारांना पोसण्यासाठी रस्ता आहे काय, की जनतेसाठी ? हे जाहीर करावे, असा सवाल त्यांनी केला आहे. तर हा रस्ता कोणत्या दर्जाचा करण्यात आला आहे हे अधिकाऱ्यांना येथे आणून दाखवण्यात आले होते. हा रस्ता व्हावा ही इथल्या लोकांची मागणी आहे. आणि तो वेळेत व्हायलाच हवा. मात्र बोगस रस्ता आणि मोरिचे एकदम निकृष्ट काम होत आहे. नागरिकाच्या एवढ्या तक्रारीकडे एकदाही आमदारांनी बघितले नाही. किंवा दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या नाही. त्यामुळे इथल्या ग्रामस्थांनी हे निकृष्ट काम बंद पाडले. मात्र, त्यानंतर ठेकेदाराने निकृष्ट कामाच्या मोऱ्या पुन्हा तोडल्या त्या तशाच आहेत. काम ही थांबले. असे असताना ठेकेदाराला दर्जेदार काम करण्याच्या सूचना देण्याऐवजी पोलिसाना घेवून ठेकेदाराला काम करण्यास आमदार केसरकर सांगतात, हे दुर्दैव आहे.

वास्तविक त्यांनी या कामाबाबत ठेकेदाराला जाब विचारून सूचना द्यायला हव्या होत्या. मात्र ठेकेदाराला पोसण्यासाठी हा निकृष्ट दर्जाचा रस्ता करून जनतेचा पैसा वाया घालवला जात आहे. हा रस्ता दर्जेदार केल्यास ग्रामस्थ जाहीर सत्कार करती. मात्र बोगस कामाची पाठराखण केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या निकृष्ट कामाचे फोटो आणि बोगस कामाबाबतचे व्हिडिओ आम्ही मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री आणि मुख्य सचिव याना पाठवणार आहोत. यावेळी आमदार दिपक केसरकर यांनी कोणाचीही पाठराखण करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page