कणकवली 9 फेब्रुवारी (प्रतिनिधी)-‘ टीईटी ‘ परीक्षेचे फॅड केवळ कोट्यावधी रुपये खाण्यासाठीच आहे अशी माझी खात्री झाली आहे . तेव्हा टीईटी परीक्षेत भ्रष्टाचार करुन लाखो रुपये उखळणाऱ्या संबंधित व्यक्तींची हकालपट्टी करुन कठोर शिक्षा करा . त्यांची गाढवावरुन धींड काढा आणि ‘ टीईटी ‘ परीक्षा रद्द करा . असे प्रा. महेंद्र नाटेकर म्हणाले . शिक्षक पालक यांची सभा आयोजित केली होती .
यावेळी प्रा . महेंद्र नाटेकर बोलत होते . यावेळी पी . बी . पाटील , विश्वनाथ केरकर , अनंत कदम , जे . जे . दळवी , रमेश मालवणकर , जगदीश गोवेकर , बंडू गोसावी इत्यादी उपस्थित होते . उपस्थित सर्वांनी चर्चेत सहभागी होऊन उच्च काठिण्य पातळी असलेल्या परीक्षा घेऊन पास होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच वरच्या वर्गात घातले पाहिजे असा आग्रह धरला .
प्रा.महेंद्र नाटेकर म्हणाले,पहिली ते चौथी पर्यंत प्राथमिक स्तरावर डी . एड् शिक्षक व पाचवी ते आठवी पर्यंत उच्च प्राथमिक स्तरावर बी एड् पदवीधर शिक्षक नेमले जातात . प्राथमिक शिक्षण स्तरावर शैक्षणिक दर्जा घसरत आहे . तो न घसरता उंचवावा म्हणून नवीन ‘ टीईटी ‘ परीक्षा पास झालेल्या शिक्षकांच्याच नेमणुका करायच्या असा शासन निर्णय झालेला आहे . ‘ टीईटी परीक्षा पास न झालेल्या शिक्षकांच्या नेमणुका न केल्यास शासन त्यांना वेतन देत नाही . संस्था चालकांनाच त्यांचे वेतन द्यावे लागते . ‘ टीईटी ‘ परीक्षा पास झाल्यावर तात्काळ नोकरी मिळते म्हणून १ ९ २० मध्ये १६७०५ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यातील ७८८० शिक्षक उमेदवार नापास झाले नापास झालेल्या उमेदवारांना एक ते अडीच लाख रुपये घेऊन पास करण्यात आले . एक वर्षानंतर आणखी तीनशे विद्यार्थ्यांना पास करण्यात आले . तसेच पास झालेल्या उमेदवारांकडूनही निकाल लावण्यापूर्वीच पैसे घेऊन पास केल्याची शक्यता नाकारता येत नाही . तेव्हा शिक्षक बोगस आहेत असे म्हणण्यापेक्षा टीईटी ( शिक्षक पात्रता परीक्षाच ) बोगस आहे असे म्हणनेच योग्य ठरेल . कारण त्यामुळे पहिली ते आठवीच्या गुणवत्तेत काहीही वाढ होणार नाही . कारण नामपात्र परीक्षा घेतल्या जातात . त्या परीक्षेत विद्यार्थी पास होवो – नापास होवो किंवा परीक्षेला न उपस्थित राहो त्या प्रत्येकाला वरच्या वर्गात घातले जाते . एवढेच नव्हे तर दहा वर्षाच्या विद्यार्थ्याने शाळेत प्रवेश घेतला तर त्याला पाचवीत बसवले जाते . वर्गात प्रवेश वयानुसार दिला जातो .
गणुवत्तेनुसार नव्हे . शिक्षकांची गुणवत्ता कमी आहे म्हणून शैक्षणिक दर्जा घसरला नसून विशिष्ट काठिण्य पातळीसह प्रश्नपत्रिका काढून त्यात प्रत्येक विषयात किमान ३५ % गुण मिळवून पास झाल्यासच त्याला वरच्या वर्गात घालायचे ह्या आपल्या सर्वसामान्य शैक्षणिक धोरणानुसार वरच्या वर्गात घातले असते तर शैक्षणिक दर्जा घसरला नसता . पूर्वी सातवीतून व्हर्नाक्युलर फायनलची सार्वत्रिक परीक्षा प्रत्येक तालुक्याच्या सेंटरवर घेतली जायची .
केंद्राचा निकाल सुमारे ३०-४० % असायचा म्हणून सातवीचा वर्ग घेणे आव्हानात्मक असायचे कमी निकाल लागलेल्या शिक्षकाची वार्षिक पगारवाढ रोखली जायची . त्यामुळे सातवीचे वर्ग शिक्षक सर्व विषय प्राण ओतून शिकवायचे . शाळेच्या वेळेबाहेरही अध्यापन करायचे व रात्रीचेही वर्ग घ्यायचे . विद्यार्थ्यांनाही रात्रंदिवस अभ्यास करायला भाग पाडायचे . पालकही आपल्या पाल्याकडून चांगला अभ्यास करुन घ्यायचे . परीक्षेची काठिण्य पातळी जबरदस्त असायची . व्हर्नाक्युलर फायनल झालेल्या उमेदवाराला तात्काळ शिक्षक , ग्रामसेवक , तलाठी , लेखनिक इत्यादी नोकऱ्या तात्काळ मिळत गेल्या . तात्पर्य शिक्षकांनी झोकून देऊन शिकवणे , विद्यार्थ्यांनी कठोरश्रम घेवून अध्ययन करणे , शिक्षक आणि पालकांनी परस्परांना साथ देत विद्यार्थ्यांकडून बारा – बारा तास अभ्यास करून घेणे हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे . यासाठी शिक्षक ‘ टीईटी ‘ उत्तीर्ण पाहिजेत असेच नाही . असे प्रा . नाटेकर शेवटी म्हणाले .
