मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यात सुरू असलेल्या वाळूच्या चोरट्या वाहतुकीला रोखण्यासाठी सध्या महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून मसुरे डांगमोडे येथे वाळूची विनापरवाना वाहतूक करणारा डंपर आज महसूल विभागाच्या पथकाने पकडला. मालवण तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून उपसा केलेल्या वाळूची चोरट्या पद्धतीने व विनापरवाना वाहतूक होत आहे.
गेल्या काही दिवसात महसूल विभागाने नेमलेल्या भरारी पथकांकडून विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. काल कुंभारमाठ येथे वाळूची विनापरवाना वाहतूक करणारा डंपर पकडला असताना आजही मसुरे डांगमोडे येथे एम.एच. ०८ डब्ल्यू २५५२ या क्रमांकाचा अमोल भास्कर नाचणकर (रत्नागिरी, आमशेद) यांच्या मालकीचा डंपर पकडला. या डंपर मध्ये एक ब्रास वाळू आढळून आली. ही वाहतूक विनापरवाना होत असल्याने महसुलच्या पथकाने हा डंपर ताब्यात घेत मालवण तहसील कार्यालय परिसरात आणून ठेवला आहे. वाळूची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी या डंपरच्या मालकास दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल प्रशासनाने दिली.
