मालवणातील भुयारी गटार योजनेची पाणी वाहतूक चाचणी यशस्वी

मालवण ता.०८-:* गेली १३ वर्षे रडतरखडत सुरू असलेले मालवण शहरातील भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण होणार कधी ? आणि काम पूर्ण झाल्यावर भुयारी गटार योग्य पद्धतीने काम करणार की नाही याबाबत मालवणच्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी ठेकेदार एजन्सी मार्फत बांगीवाडा, धुरीवाडा, रेवतळे मार्गावर असलेल्या भुयारी गटार योजनेच्या चेंबर पाईप लाईन मधून पंपिंग स्टेशन विहीर पर्यत घेण्यात आलेली पाणी वाहतूक चाचणी यशस्वी ठरली.

पर्यटन शहर असलेल्या मालवण शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कोट्यावधी खर्चाच्या भुयारी गटार योजनेचे काम २००९ पासून अतिशय संथ गतीने सुरू आहे. सुरुवातीच्या काही टप्प्यात वेगाने सुरू झालेले हे काम गेल्या पाच वर्षात मंदावले आहे. भुयारी गटार योजनेच्या कामावरून मालवण नगरपालिकेत राजकारणही रंगत राहिले आहे. पावसाळ्यात या योजनेतील चेंबर पाणी भरून रस्त्यावर वाहत असल्याने या योजनेच्या कामाबाबत आणि भविष्यातील यशस्वीतेबाबत नागरिकांच्या मनात नेहमीच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भुयारी गटार योजनेचे काम कधी पूर्ण होणार याची प्रतीक्षा नागरिकांना लागून राहिली आहे. या पार्श्वभूमीवर सध्या शहरात या योजनेची चाचणी घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

यापूर्वी बाजारपेठ मार्गावर या योजनेची घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली होती. आज मंगळवारी ठेकेदार एजन्सी मार्फत बांगीवाडा, धुरीवाडा, रेवतळे मार्गावर असलेल्या भुयारी गटार योजनेच्या चेंबर पाईप लाईन मधून पाणी सोडून ते पंपिंग स्टेशन विहीर पर्यत पोहचते का याची चाचणी घेण्यात आली. पाणी वाहतूकीची ही चाचणी यशस्वी ठरली. दरम्यान, योजनेचे बहुतांश काम मे ते जून पूर्ण होईल, असा विश्वास ठेकेदार एजन्सीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. दांडी भागातील पंपिंग स्टेशन विहिरीची जागा अद्याप नगरपालिकेकडून निश्चित झालेली नाही. तर मच्छीमार्केट जवळील मोठा चेंबर उभारणी होणार त्या जागी हायमास्ट टॉवर उभारणी तसेच चिरेबंदी बांधकाम झाल्याने चेंबर उभारणी रखडली आहे. नगरपालिकेने जागा मोकळी करून दिल्यास तेही काम एप्रिल-मे महिन्यात पूर्ण केले जाईल, असेही ठेकेदार एजन्सीने सांगितले. काही मशनिरी आणणे व झालेल्या कामांबाबत नगरपालिकेकडून निधी मिळेल त्यानुसार कामे पूर्ण केली जातील. असेही सांगण्यात आले.

You cannot copy content of this page