कणकवली ता.०८-:* शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेज, कणकवली येथे ‘कनक’ विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय वाड्.मय लेखन कार्यशाळा आयोजित केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लेखन विषयक क्षमतांचा विकास व्हावा व नव्या पिढीत लेखन विषयक कौशल्य वाढीस लागावे यासाठी या कार्यशाळेचे या वर्षी प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सोमवार १४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ४ या वेळेत संपन्न होणार असून या कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन पी.डी. कामत , सचिव विजयकुमार वळंजू, विश्वस्त डॉ.राजश्री साळुंखे यांच्या उपस्थितीत होणार आहे.उदघाटन सत्राच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत कवितेची निर्मिती प्रक्रिया, कथनात्मक वाड्.मय निर्मिती प्रक्रिया, ललित लेखन निर्मिती प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. सुप्रसिद्ध कवी अजय कांडर, कथाकार प्रा. डॉ.प्रज्ञाकुमार गाथाडे, सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका डॉ.सई लळीत इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत तसेच वेगवेगळ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ.अनिल फराकटे,प्रा.डाॅ.लालासाहेब घोरपडे,प्रा.वनिता ढोके- सावंत उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेच्या समारोपाच्या कार्यक्रमात शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून कला व वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथील प्र.प्राचार्य समीक्षक डॉ.सतिश कामत मार्गदर्शन करणार आहेत. तरी या जिल्ह्यातील सर्व उत्सुक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या लेखन कार्यशाळेत सहभागी व्हावे व नावनोंदणी करावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले,’कनक’ विभागातील प्रा.डाॅ.सोमनाथ कदम,प्रा.सीमा हडकर,प्रा.स्वीटी जाधव,प्रा.डॉ.भिकाजी कांबळे,प्रा.विजयकुमार सावंत,प्रा.मीना महाडेश्वर,प्रा.व्ही.सी.सावंत,प्रा.डॉ. मारोती चव्हाण यांनी केले आहे.
