पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे मनीष दळवी यांचा सत्कार

मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि नूतन बँक संचालक बाबा परब यांची ओरोस येथील सिंधुदुर्ग बँक प्रधान कार्यालयात भेट घेऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेने व्यावसायिकांच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती पर्यटन व्यावसायिक महासंघा तर्फे करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट, मच्छिमार, शेतकरी, व्यापारी व पर्यटन व्यावसायिक यांना व्यवसाय वाढीसाठी व जिल्ह्यात रोजगार निमिर्तीचे मोलाचे कार्य बँकेच्या माध्यमातून होत आहे.

गेले दोन वर्षे कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील व्यावसायिक हा उध्वस्त झाला असून त्यांच्या व्यवसायाचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे थकीत कर्जाचे प्रमाण वाढले असून यासाठी बँकेच्या माध्यमातून व्यावसायिकांस दिलासा देण्यासाठी व नवउद्योजकास व्यवसाय वाढीसाठी आर्थिक सहाय्यासाठी बँकेने मदत करावी, अशी विनंती यावेळी महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी केली. सिंधुदुर्ग बँक हि व्यावसायिकांच्या सोबत असून बँकेचे कर्ज घेतलेल्या व्यवसायिकांना त्यांचे कर्ज सुलभरित्या भरण्यासाठी बँक नवीन योजना लवकरच जाहीर करेल तसेच जिल्ह्यातील व्यवसाय वाढीसाठी उद्योजकानां व पर्यटन व्यावसायिक महासंघास बँक पूर्णपणे सहकार्य करेल, असे आश्वासन यावेळी बँक अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिले. यावेळी महासंघाचे सोशल मीडिया प्रमुख किशोर दाभोलकर, महासंघ महिला तालुका अध्यक्ष मेघा सावंत, सौ. चारुशीला आचरेकर, सौ. कासवकर, महासंघ शहर अध्यक्ष मंगेश जावकर, तारकर्ली पर्यटन संस्था अध्यक्ष सहदेव साळगांवकर, रवींद्र खानविलकर मिलिंद झाड, रामा चोपडेकर, दादा वेंगुर्लेकर, अभय पाटकर, मिथिलेश मिठबावकर, देवानंद लोकेगांवकर व अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page