स्वनिधीतून रस्ते, पायवाटा घेण्यास अडचण नाही

वित्त समिती सभेत कॅपो वल्लरी गावडे यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी ता ०३ जिल्हा परिषद स्व निधीतून नागरिकांच्या सोई- सुविधेसाठी अत्यावश्यक असलेल्या पायवाटाची कामे का घेऊ नये, ती घेण्यास काय अडचणी आहेत. या बाबत सदस्य संतोष साटविलकर यांनी वित्त विभागाकडे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली असता लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे यांनी स्व निधीतून पायवाटांची कामे घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचे सभेत स्पष्टीकरण दिले .

जिल्हा परिषद वित्त समितीची सभा सभापती महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे ,समिती सदस्य संतोष साटवीलकर, संजय देसाई ,रवींद्र जठार ,नितीन शिरोडकर आदींसह खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. आजच्या वित्त समिती सभेत खर्चाचा आढावा घेतला असता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा स्व उत्पन्नातील निधी केवळ १४ टक्केच खर्च झाला असल्याचे वित्त विभागाच्या अहवालावरून सभेत स्पष्ट झाले. सन २०२१-२२ हे आर्थिक वर्ष संपत आले असून जिल्हा परिषद स्व उत्पन्नातील निधी केवळ १४ टक्केच खर्च झाल्याने उर्वरित ८६ टक्के अखर्चित निधी दोन महिन्यात खर्च होणार असा प्रश्न सदस्यानी उपस्थित केला.

जिल्हा परिषद स्व निधी १७ कोटी ९९ लाख २७ हजार रुपयांपैकी २ कोटी ५२ लाख ६५ हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. याची टक्केवारी केवळ १४ टक्के एवढी आहे. अभिकरण योजना २५ कोटी १० लाख ६२ हजार पैकी १७ कोटी ६९ लाख ५ हजार रुपये, दुरुस्ती देखभाल ७ कोटी १५ लाख २३ हजार पैकी १ कोटी १२ लाख १ हजार रुपये तर खासदार निधी १ कोटी ४३ लाख २६ हजार पैकी ८७ लाख ९७ हजार ४६३ रुपयांचा निधी खर्च झाला आहे असल्याची माहिती सभेत देण्यात आली.

सन २०२१-२२ हे आर्थिक वर्ष संपत आले तरी जिल्हा परिषद स्व निधी खर्च न होण्यामागची कारणे काय? केवळ १४ टक्के निधी खर्च झाला आहे. अजूनही ८६ टक्के म्हणजेच तब्बल १५ कोटी ४६ लाख ६२ हजार रुपयांचा निधी शिल्लक आहे. तो कसा खर्च होणार अशी विचारणा करत सदस्य संतोष साटविलकर यांनी जि प बजेट मध्ये वित्त व बांधकाम विभागला संगणक खरेदी साठी निधीची तरतूद असताना अद्याप खरेदी का झाली नाही. स्वतः साठी आवश्यक असलेले संगणक खरेदी करण्यासाठी दहा महिने लागत असतील तर निधी कसा खर्च होणार असा प्रश्न संतोष साठविले कर यांनी उपस्थित केला वित्त विभाग व बांधकाम विभागाला संगणक खरेदी करण्यासाठी सुमारे १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यातील ८ लाखांचा निधी खर्च झाला आहे तर ७ लाखांचा निधी अखर्चित आहे. विशेष म्हणजे बांधकाम विभागाला संगणक खरेदी करण्यासाठी तरतूद करण्यात आलेल्या ३ लाख पैकी ३ लाख शिक्कल आहे. त्यामुळे यावर सदस्य संतोष साटविलकर यांनी आक्षेप घेत संगणक खरेदी का झाली नाही असा प्रश्न उपस्थित केला. तसेच जिल्हा परिषद स्वनिधीतून नागरिकांचा सोयीसुविधांसाठी अत्यावश्यक असलेल्या पायवाटाची कामे घेण्यास प्रशासनाची अडसर का? स्व निधीतून पायवाटा घेता येतात किव्हा नाहीत याबाबत वित्त विभागाने आपले स्पस्टिकरण करावे. असा आग्रह संतोष साटविलकर यांनी धरला असता लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे यांनी जि प स्व निधी मधून पायवाटा घेता येतील असे स्पस्टीकरण केले.

You cannot copy content of this page