प्रसाद गावडे यांचे गौरवोदगार; मनसेच्यावतीने ‘बिलिमारो’ टीमचा सत्कार
कुडाळ ता.०२-:* कुडाळ येथील “ढ” मंडळींनी राज्यात इतिहास घडविला असून खऱ्या अर्थाने “ढ” ची प्रतिमा उजाळली आहे, असे गौरवोद्गार मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी काढले. पनवेल येथे पार पडलेल्या अटल करंडक २०२२ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत कुडाळ येथील “ढ” मंडळीनी महाअंतिम फेरीत सादर केलेल्या “बिलिमारो” या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला.
या यशासह कुडाळचे नाव राज्यात झळकावल्याने मनसेच्यावतीने ‘बिलिमारो’च्या टीमचा सत्कार करण्यात आला. नेरूर येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मनसेच्यावतीने शाल, श्रीफळ व कलेचा ईश्वर श्री देव कलेश्वराची प्रतिमा भेट देऊन कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, जिल्हा सचिव बाळा पावस्कर, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, कुडाळ तालुका सचिव राजेश टंगसाळी, उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे, जगन्नाथ गावडे, अविनाश अणावकर, नेरूर विभाग अध्यक्ष भूषण परब, अक्षय जोशी, रोशन चव्हाण, वैभव धुरी, गजानन राऊळ, अमोल जंगले आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. आगामी काळात “बिलिमारो” टीमच्या सदस्यांना मराठी नाट्यसृष्टी व चित्रपटसृष्टी स्तरावर मदत व मार्गदर्शन लागल्यास मनसे चित्रपट संघटनेच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी प्रसाद गावडे यांनी दिली. आगामी काळात अशीच कौतुकाची थाप सदैव पाठीवर राहू द्या, अशी भावना व्यक्त करत “बिलिमारो” टीमच्या सदस्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
