जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या;जिल्हा परिषद अध्यक्षा, उपाध्यक्ष, सभापती, सदस्य सहभागी
ओरोस ता २ जिल्हा नियोजन समिती सभेत मनमानी कारभार करून अन्याय केल्याच्या विरोधात भाजपचे जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्यासह विषय समिती सभापती, भाजप जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सरपंच यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहत जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना देसाई यांनी दिले आहे. अतिवृष्टी व पुरहानी अंतर्गत कामांच्या सदोष याद्यांना स्थगिती देऊन नव्याने याद्या करण्यात याव्यात. जिखा वार्षिक योजना २०२१-२२ मधील कामांना तातडीने मान्यता देण्यात यावी. जिल्हा परिषदेला देणे असलेली दायित्वाची रक्कम तातडीने शासनाकडून मिळावी, अशाप्रकारची मागणी रणजित देसाई यांची आहे.
