*मानधनाची निम्मी रक्कम दरमहा पेन्शन म्हणून मिळण्यासाठी सुरू आहे आंदोलन*
ओरोस ता ४ सेवा निवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर एकरक्कमी पेन्शन ऐवजी मानधनाच्या निम्मी रक्कम दरमहा पेन्शन म्हणून मिळावी यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज राज्यभर मागणी दिन आंदोलन केले. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा अंगणवाडी कर्मचारी कृती सभेच्यावतीने जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विजय असो.. आमच्या मागणी मान्य करा.. अंगणवाडी कर्मचारी युनियनचा विजय असो… हम सब एक है.. आदी घोषणा देत अंगणवाडी कर्मचारी कृती सभेच्या जनरल सेक्रेटरी कमल परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज सोमवारी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन छेडले. यावेळी दिपाली पठाणी, नेहा मांजरेकर, वंदना पाटकर, लक्ष्मी परब, संयोगिता पालव, विद्या मेस्त्री आदी कुडाळ तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या. सेवानिवृत्त होणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने एप्रिल २०१४ पासून एक रक्कमी पेन्शन देण्यास शासनाने सुरुवात केली आहे. निवृत्त होत असताना मिळत असलेलं मानधन गुणुले सेवेची पूर्ण वर्षे असा एकूण रक्कमेचा फॉर्म्युला आहे. तसेच सेविकेला जास्तीत जास्त १ लाख तर मदतनीस ला ७५ हजार रुपये पेन्शन मर्यादा घालण्यात आली होती. त्यानुसार ही पेन्शन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने देण्यास सुरुवात केली. मात्र एक रक्कमी पेन्शन मिळाल्यावर ही रक्कम या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या लग्नासाठी आणि घराच्या कामासाठी खर्च होते. परिणामी त्यांच्या हातात काहीच उरत नाही आणि निवृत्तीनंतर त्यांची पुन्हा उपासमार सुरू होते. त्यामुळे शासनाने आपल्या फोर्मुल्यात बदल करून या कर्मचाऱ्यांना एक रक्कमि पेन्शन न देता निवृत्तीच्या वेळी सुरू असलेल्या मानधनाच्या निम्मी रक्कम दरमहा पेन्शन म्हणून द्यावी अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी कृती सभेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच याबाबत शासनाने निर्णय घावा याकडे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र भर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्यावतीने मागणी दिन आंदोलन छेडण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा अंगणवाडी कर्मचारी कृती सभेच्यावतीने जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना अंगणवाडी कर्मचारी नेत्या कमल परुळेकर म्हणाल्या की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीनंतर पेन्शन देण्यासाठी शासनाने २०१४ पासून भारतीय आयुर्विमा महामडळा ला अर्थात एल आय सी ला पैसे देवून त्यांच्यामार्फत कर्मचाऱ्यांना एक रक्कमी पेन्शन देण्याबाबत करार झाला होता. मात्र ३-४ वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अद्याप निवृत्तीरक्कम मिळालेली नाही. तसेच याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती घेतली असता एल आय सी कडून ७३ कोटी वाटप करण्यात आले असल्याची माहिती समोर आली मात्र प्रत्यक्षात कोणाला मिळाले नाही ही तर फसवणूक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महिला व बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर आणि विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे असे सांगितले. दरम्यान अंगणवाड्या सुरू करण्यासाठी आग्रह केला जात आहे. आम्ही अंगणवाड्या सुरू करण्यास तयार आहोत मात्र काही घडल्यास त्याला शासन आणि जिप प्रशासन जबाबदार राहील असेही कमल परुळेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
