*मच्छीमारांचा शासनावर गंभीर आरोप
मालवण : ‘ क्यार ‘ आणि ‘ महा ‘ चक्रीवादळातील नुकसान भरपाईपोटी बँक खात्यात तुटपुंजी रक्कम जमा करून शासनाने मच्छीमारांची चेष्टा केल्याचा आरोप मच्छीमारांकडून होतो आहे . मालवणातील काही नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या बँक खात्यात केवळ २६०० रुपये जमा करून एक प्रकारे त्यांची बोळवण करण्यात आली असल्याचे मत मच्छीमारांमधून व्यक्त होत आहे . ‘ क्यार ‘ व ‘ महा ‘ चक्रीवादळामुळे ज्या मच्छीमारांच्या नौकांचे , जाळ्यांचे किंवा अन्य साहित्याचे नुकसान झाले होते . त्यांना भरपाईपोटी विभागीय आयुक्त कोकण विभागाकडून नैसर्गिक आपत्ती निवारण सहाय्य या लेखाशीर्षाखाली २०२० २१ या वित्तीय वर्षासाठी हे २ कोटी ६१ लाख रुपये अनुदान सिंधुदुर्गला प्राप्त झाले आहेत . यात देवगड तालुक्यासाठी ५१ लाख ८५ हजार , मालवण १४ लाख ८५ हजार आणि वेंगुर्ले तालुक्यासाठी १ कोटी ९ ४ लाख ३० हजार इतका निधी मंजूर आहे . मात्र , मालवणातील ज्या मच्छीमारांच्या खात्यात २६०० रुपये इतकी नुकसानभरपाईची रक्कम जमा झालेली आहे , अशा मच्छीमारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . एक नवीन जाळे विकत घ्यायला किती रुपये लागतात हे कदाचित शासनाला माहिती नसावे . मच्छीमारांना शासकीय मदत देताना प्रत्येकवेळी शासनाकडून दुजाभाव केला जातो , असा आरोप या मच्छीमारांकडून होतो आहे .
