बांदा ता.२९-:* पोलीस आणि जनता यामधील महत्त्वाचा दुवा पोलिस पाटील आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलिस पाटलांना नेहमीच अनेक नैसर्गिक व शारीरिक संकटांचा सामना करावा लागतो. शेर्ले पोलीस पाटील विश्राम जाधव यांना नुकताच कॅन्सर असल्याचे समजताच सावंतवाडी-बांदा-दोडामार्ग-वेंगुर्ले या उपविभागाच्या पोलिस पाटील संघटनेच्यावतीने त्यांना उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. कांबळे, बांदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्यामराव काळे यांच्या उपस्थितीत आर्थिक मदतीचा हात देण्यात आला.
यावेळी पोलिस पाटील उपविभागीय संघटनेचे पदाधिकारी, मडुरा पोलिस पाटील नितीन नाईक, ओटवणे पोलिस पाटील शेखर गावकर, इन्सुली पोलिस पाटील जागृती गावडे आणि अन्य पोलिस पाटील उपस्थित होते. घरची परिस्थिती हलाखीची आणि त्यात कॅन्सरसारखा आजार जीवनाच्या वाटेवर उभा असल्याने विश्राम जाधव यांना आर्थिक गरज भासणार आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार की आजाराबरोबर लढणार अशी परिस्थिती विश्राम जाधव यांची आहे. असे असूनही श्री. जाधव हे कोणतीही रजा न घेता अजूनही आपले सेवाभावी कार्य अविरत सुरू ठेवले आहे. अशा पाेलिस पाटलांची समाजाला पर्यायाने प्रशासनास निरंतर आवश्यकता असल्याने आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे संघटनेचे नितीन नाईक यांनी सांगितले.
