कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्काराने कविता लेखिका कविता शिर्के यांचा गौरव…

समाज साहित्य संघटनेकडून करण्यात आला गौरव

*💫कणकवली दि.०३-:* मराठी साहित्यात आज चांगली कविता लिहिली जात आहे. बहिणाबाई ते आजच्या शरयू आसोलकर यांच्यापर्यंत कवयित्रींनी मराठी कविता समृद्ध केलेली आहे. हाच गुणवत्तेचा धागा पकडून कवयित्री कविता शिर्के कविता लेखन करत आहेत. त्यामुळे त्यांना समाज साहित्य संघटना सिंधुदुर्गतर्फे कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्काराने गौरवण्यात आले. कवितेचा आवाज सतेच्याही विरोधात उठवायचा असतो.मात्र सोशल मीडियाच्या आजच्या काळात प्रसिद्धीपासून दूर राहू शकतो तोच चांगली कविता लिहू शकतो. समाज साहित्य संघटना यापुढील काळात अशा कवींची दखल घेऊन त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करणारा असल्याचे प्रतिपादन नामवंत कवी अजय कांडर यांनी येथे केले. समाज साहित्य संघटना आणि कवी लेखक संघटना सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार श्री कांडर यांच्या हस्ते पुणे शिरूर येथील कवयित्री कविता शिर्के यांना येथे प्रदान करण्यात आला. शहरातील तरंदळे रोड येथील आदर्श रेसिडेन्सी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात बोलताना कांडर यांनी मराठीत आज खूप कविता लिहिली जात आहे परंतु गुणवत्तेने लिहिणारे कवी आजच्या बाजारु व्यवस्थे पासून दूर राहून लिहित आहेत. त्यांना नव्या कवींनी जोडून घ्यायला हवे असे आग्रहाने सांगितले. कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कदम यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कार्यक्रमाला समाज साहित्य संघटनेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, संघटनेचे पदाधिकारी सुर्यकांत चव्हाण, मनीषा पाटील, किशोर वालावलकर, नीलम यादव, प्रमिता तांबे, श्री मुल्ला, मेघना सावंत आदी उपस्थित होते. श्री कांडर म्हणाले, चांगली कविता लिहिण्यासाठी त्या कवीला आपल्या भाषेतील कवितेची परंपरा नीट माहीत असायला पाहिजे. सत्तरच्या दशकातील महत्त्वाच्या कवींपैकी कविवर्य सुर्वे होते आणि ते आपल्या सिंधुदुर्ग भूमीतील असल्याचा आपल्याला अभिमानच वाटायला हवा.ज्या कष्टकरी वर्गाचे नेतृत्व आपल्या कवितेतून सुर्वे करत होते त्यांच्याच नावाचा कष्टकरी वर्गातून पुढे येणाऱ्या कवयित्री शिर्के यांना काव्य पुरस्कार देण्यात आला ही चांगली घटना आहे. शिर्के यांची कविता भूमिहीनांचा आवाज व्यक्त करते. त्यांची कविता धरणग्रस्तांची, भूमिहीनांची वेदना, कष्टकऱ्यांचे दुःख प्रातिनिधिक होऊन समोर येते.त्यामुळे या कवितेचा भविष्यकाळ उज्वल आहे. सौ.शिर्के म्हणाल्या, आपण माणूस आधुनिक झाला म्हणतो पण आपले विचार मात्र आधुनिक झाले नाहीत. त्यामुळे अनेक स्त्रियांची बरीच ऊर्जा पारंपरिक अनिष्ट जगण्यात व्यर्थ जाते. एक सजग कवयित्री म्हणून मला नेहमी वाटत राहत की स्त्रियांची अशी ऊर्जा वाया जाता नये. कोकणच्या मातीला साहित्याचा सुवास आहे. इथली माणसं, इथला निसर्ग माणसांना आपल्या प्रेमात पडतो. इथल्या भाषेतील गोडवा माणसाला माणुसपणावर विश्वास ठेवायला भाग पाडतो. आयुष्यात आपण कोणाच्या संगतीत राहतो आणि आपण काय वाचतो या दोनच गोष्टी आपलं भविष्य ठरवत असतात. कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार देऊन तुम्ही मला कोकणच्या मातीशी जोडून घेतले. तुमच्या प्रत्येकाच्या मनातील आत्मीयता पाहून मला वाटत हा पुरस्कार म्हणजे जणू माझ्या माहेरिच माझी खणा नारळानेच तुम्ही ओटी भरली आहे. किशोर कदम म्हणाले, समाज साहित्य संघटनेतर्फे कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाचा पुरस्कार देण्यात आला यातूनच ही संघटना कष्टकरी वर्गाशी जोडून राहु पाहते हे स्पष्ट होते. या संघटनेत परिवर्तन चळवळीत अनेक वर्ष काम करणारी चांगली माणसं कार्यरत आहेत.त्यामुळे या संघटनेचा भविष्यकाल निश्चितच चांगला असणार आहे. आजच्या काळात चांगलं सांस्कृतिक काम होणे ही गरजेची गोष्ट आहे. सांस्कृतिकदृष्ट्या माणूस समृद्ध झाला तरच समाज समृद्ध होत असतो. मातोंडकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अनेक साहित्य सांस्कृतिक चळवळी कार्यरत आहेत.अशावेळी अजून ही एक समाज साहित्य संघटना कशाला? असा प्रश्न सहज पडेल.परंतु आताच्या काळात माणसाला समृद्ध करण्यासाठी अनेक साहित्यिक चळवळी निर्माण होणे गरजेचे आहे. आणि या चळवळी समाजाला जोडल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे समाज साहित्य संघटना स्थापन करण्यात आली आहे. या पहिल्याच कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला नारायण सुर्वे यांच्या नावाचा कविता शिर्के यांच्यासारख्या निष्ठेने कविता लिहिणाऱ्या कवयित्रीला पुरस्कार देण्यात आला.याचं या संस्थेचा अध्यक्ष म्हणून समाधान वाटत आहे प्रास्ताविक नीलम यादव यांनी केले.सूत्रसंचालन प्रमिता तांबे यांनी केले. आभार मनीषा पटेल यांनी मानले

You cannot copy content of this page