राष्ट्रसेविका समितीतर्फे भारत माता पूजन कार्यक्रम संपन्न

*⚡मालवण ता.२७-:* राष्ट्र सेविका समिती, जयमती शाखा मालवण यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त मेढा मालवण येथील मुरलीधर मंदिरात भारत माता पूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी समितीच्या ज्येष्ठ सेविका सुहासिनी फणसेकर यांच्या हस्ते भारत माता पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व सेविकांनीही भारत माता पूजन केले.

समितीच्या सेविका सौ. संस्कृती बांदकर यांनी प्रजासत्ताक दिनाचा अर्थ व माहिती सांगत त्याचे महत्त्व विशद केले. आपला भारत देश हा लोकांनी लोकांसाठी, लोकांकरवी चालविलेले राज्य असून हे लोकशाही राज्य चांगल्या पद्धतीने चालविणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे यावेळी सौ. बांदकर यांनी सांगितले. यावेळी श्रीधर काळे यांनीही प्रजासत्ताक दिनानिमित आपले विचार व्यक्त केले. संसद, सर्वोच्च न्यायालय व शासन याचा अर्थ थोडक्यात सांगून आपल्या या तिन्ही संस्था संविधानाने म्हणजे घटनेने दिलेल्या अधिकारानुसार चालतात. नागरिकांना मूलभूत अधिकार व कर्तव्ये असून ती संविधानाने दिली आहेत. त्यानुसार एक नागरिक म्हणून आपण वागले पाहिजे. चांगले नागरिक घडविणाऱ्या माताभगिनी घडविण्याचे कार्य राष्ट्र सेविका समिती करते, असे काळे यांनी सांगितले. यानंतर वैभवी सातार्डेकर हिने भारत मातेची आरती गायली.

You cannot copy content of this page