*⚡मालवण ता.२७-:* मालवण तालुक्यातील तिरवडे उगवतीवाडी येथील एका कन्स्ट्रक्शन साईट वरील साहित्यासह मोटारसायकल चोरी प्रकरणी मालवण पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आणि पोलीस कोठडीत असलेल्या गणेश काळूराम भगत ( वय ३०, रा. शिलारवाडी, शिलारगाव, शिलार, ता. कर्जत, जि. रायगड) याला पोलिसांनी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे ऍड. स्वरूप पई व ऍड. अंबरीश गावडे यांनी काम पाहिले.
कुडाळ तालुक्यातील पडवे शिर्केवाडी येथील आनंद शंकर दामोदर यांचा मालवण तालुक्यातील तिरवडे उगवतीवाडी येथे आनंदवन नावाची कन्स्ट्रक्शन साईट असून त्याठिकाणी प्रोजेक्ट कामगार म्हणून काम करणाऱ्या गणेश भगत याने दि.२० नोव्हेंबर २०२१ रोजी कन्स्ट्रक्शन साईट वरून मोटरसायकलसह वायर बंडल, सिलिंग फॅन, कपाट, टेबल, खुर्च्या, लोखंडी टिकाव, खोरी, फायबरची घमेली असे ६० हजार किमतीचे साहित्य चोरून पोबारा केला होता. त्यामुळे आनंद दामोदर यांनी गणेश याच्या विरोधात मालवण पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी गणेश भगत याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर मालवण पोलिसांनी गणेश भगत याला २२ जानेवारी रोजी अटक करून मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गणेश याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दि. २५ रोजी पोलिसांनी संशयित आरोपीला न्यायालयात हजर करुन पुन्हा पोलिस कस्टडीची मागणी केली. मात्र आरोपीतर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पोलिस कस्टडीची मागणी फेटाळून आरोपीला न्यायालयीन कोठडी मंजूर केली. आरोपीतर्फे दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज सुनावणीअंती मंजूर करून १५ हजार रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली.
