⚡सावंतवाडी ता.०६-:
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या तालुकास्तरीय १४ वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धेत ‘मदर क्वीन इंग्लिश स्कूल’च्या संघाने दिमाखदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तालुक्यातील एकूण आठ दिग्गज संघांमध्ये रंगलेल्या या चुरशीच्या स्पर्धेत मदर क्वीन स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला.
या संपूर्ण स्पर्धेत मदर क्वीन इंग्लिश स्कूलच्या जियाद शेख याने आपल्या बॅटिंगचा धडाका दाखवून दिला. संपूर्ण स्पर्धेत दोन धडाकेबाज अर्धशतके झळकावणाऱ्या जियादने अंतिम सामन्यातही ३ उत्तुंग षटकार ठोकून झंझावाती खेळी साकारली. त्याच्या या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर त्याला ‘स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज’ या किताबाने सन्मानित करण्यात आले.
तसेच, बॅटिंग आणि बॉलिंग अशा दोन्ही आघाड्यांवर छाप पाडणाऱ्या मदर क्वीन स्कूलच्या श्रेयस कांबळे याला ‘अष्टपैलू खेळाडू’ (All-Rounder) म्हणून गौरवण्यात आले.
आठ संघांच्या कडव्या आव्हानावर मात करत मिळवलेल्या या विजयामध्ये श्रेयस कांबळे याच्यासह यश बिरोडकर, यश जाधव आणि युवराज राऊळ यांनी मोलाची कामगिरी बजावली. सर्व खेळाडूंच्या या सांघिक आणि अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मदर क्वीन स्कूलने तालुकास्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले. या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे, मार्गदर्शक प्रशिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.

