‘गॉडफादर’ कोण, हे जनतेसमोर आणा; वायरल व्हिडिओतील आरोपांची तातडीने दखल घ्या, ॲड. समीर वंजारी..

⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी नगरपालिकेतील कथित पाणी गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची प्रशासनाने तातडीने व निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी माजी जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे ॲड. समीर वंजारी यांनी केली आहे.
संबंधित प्रकरणामागे राजकीय संरक्षण किंवा मोठे जाळे असल्याचे आरोप होत असतील, तर त्यामागे नेमके कोण आहे, याचाही तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, असे त्यांनी म्हटले आहे.
वायरल व्हिडिओमध्ये नगरसेवक तसेच पाणीपुरवठा सभापती यांच्याबाबत करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता तपासणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्ती दोषी आहे की नाही, हे निष्पक्ष चौकशीतून स्पष्ट होईल. मात्र, या कथित गैरव्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग किंवा राजकीय वरदहस्त असल्याचे आरोप होत असल्याने त्या सर्व बाबींचीही चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका ॲड. वंजारी यांनी मांडली.
संबंधित व्यक्तीने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबत केलेले वक्तव्यही गंभीर असून, त्याची पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणात संबंधित पदाधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून चौकशीला सामोरे जावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाबाबत पालकमंत्री अथवा जिल्हाधिकारी स्तरावर यापूर्वी काही चौकशी झाली असल्यास तिचे निष्कर्ष काय होते आणि त्यावर कोणती कार्यवाही करण्यात आली, हे प्रशासनाने जनतेसमोर स्पष्ट करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
नगरपालिकेतील कथित आर्थिक अनियमितता, विविध कामांमधील व्यवहार तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असल्याचा आरोप असलेल्या आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, निविदा, देयके आणि प्रशासकीय निर्णय तपासण्यात यावेत, असे ॲड. वंजारी यांनी सांगितले. सार्वजनिक निधीच्या वापरामध्ये अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. जनतेच्या पैशाच्या संरक्षणाच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, विरोधी पक्षनेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी यापूर्वी या विषयावर कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता ते नगरपालिकेच्या सभागृहात या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी करणार का, तसेच नगराध्यक्षांच्या नैतिक जबाबदारीबाबत काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
वायरल व्हिडिओतील आरोपांची सत्यता तपासण्यासाठी चौकशी नेमकी कधी सुरू होणार, याबाबत प्रशासनाने जनतेला स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी ॲड. वंजारी यांनी केली.
सावंतवाडी नगरपालिकेतील कथित पाणी गैरव्यवहाराची उच्चस्तरीय, स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे. अन्यथा या प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाही व कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ॲड. समीर वंजारी यांनी दिला.
