कणकवलीतील दागिने चोरी प्रकरण; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई..

⚡ओरोस, ता.०६-: कणकवली येथील घरातून सोन्याचे दागिने व अन्य साहित्य चोरी करून गेली तीन वर्षे वेगवेगळ्या राज्यांत स्वतःचे अस्तित्व लपवत फिरणाऱ्या संशयित आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुंबईतील ताडदेव परिसरातून ताब्यात घेतले. लीलाधर मोडाराम सुथार (वय ३९, मूळ रा. पिंपासार नागोर, राजस्थान) असे त्याचे नाव आहे.
कणकवली पोलिस ठाण्यात १५ जून २०२३ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाथ पै नगर, कणकवली येथील सतीश विजय नाईक यांच्या घरी सुथार सुमारे वर्षभर कामाला होता. त्या काळात नाईक यांच्या पत्नीचे सुमारे ३.७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, त्यामध्ये सोन्याच्या बांगड्या, अंगठीसह अन्य दागिने, तसेच सुमारे एक लाख रुपये किमतीचे लाकडी प्लायवूड चोरून तो पसार झाला होता.
गुन्ह्यानंतर संशयिताने गोवा, राजस्थानमधील जयपूर, उदयपूरसह विविध ठिकाणी वास्तव्य बदलत स्वतःची ओळख आणि ठावठिकाणा लपविल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यामुळे गेली तीन वर्षे पोलिस त्याच्या मागावर होते.
दरम्यान, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीतून सुथार हा मुंबईतील ताडदेव परिसरात असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समजले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या पथकाने आज आराध्या आवान बिल्डिंगजवळ, भाटिया हॉस्पिटलच्या मागील परिसरात सापळा रचला. तेथे संशयिताला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार जॅकसन घोन्सालविस, पोलिस कॉन्स्टेबल अमर कांडर तसेच कणकवली पोलिस ठाण्याचे हवालदार पांडुरंग पांढरे यांच्या पथकाने केली.
फोटो ओळ:-
