अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मनसे तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांची मागणी
*⚡कणकवली ता.२४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील फोंडा, पियाळी, कासार्डे वगैरे गावांतील इको सेन्सेटिव्ह झोन क्षेत्रात अनधिकृत वाळू उत्खननामुळे नैसर्गिक स्त्रोतांचे नुकसान होत आहे तसेच शासनाचा ४ कोटी ९१ लाख महसूल बुडाल्याने झालेल्या नुकसान प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर उचित कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे कणकवली तालुका अध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांनी संबंधित खात्याचे प्रमुख प्रल्हाद जोशी यांच्याकडे केली आहे. त्यासंदर्भात सादर केलेल्या निवेदनात दत्ताराम बिडवाडकर म्हणतात, ७ फेब्रुवारी २००२ च्या शासन निर्णयांनुसार व्यापार, वाणिज्य व खनिकर्म विभाग बंद करण्यात येऊन त्या विभागातील विषय उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत.
परंतु या विभागाकडून सिंधुदुर्गातील खनिज उत्खनन व रॉयल्टी दंड वसुली प्रकरणी प्रचंड दुर्लक्ष होत असून शासनाचा महसूल बुडविल्याचे काम संबंधित अधिकारी करीत आहेत. खनिजांवरील स्वामित्व धनाद्वारे (रॉयल्टी) राज्याच्या तिजोरीमध्ये भर घालण्याच्या उद्दशाने “राज्य खनिज धोरण १९९९” तयार करण्यात आले होते. त्यानुसार लोहखनिज, मँगनीज, कायनाईट, सिलीमनाईट, बॉक्साईट, सिलिका उत्खनन यासंदर्भात खाणी व खनिजे (विकसन व विनिमयन) अधिनियम १९५७ व खनिज सवलत नियम १९६० मधील विहीत नियमांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिलिका व वाळू खनिजांचा वापर होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे (नागसावंतवाडी) पियाळी, वाघेरी, लोरे, फोंडा, आर्चिणे या गांवातून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उत्खनन होत असून वॉशिंग प्लांट बसविलेले आहेत. शेती पंप घेऊन वॉशिंग प्लांट बांधले आहेत. ते पाणी नदीमध्ये सोडले जाते.
त्यामुळे सदरील गांवातील पिण्याचे पाणी दुषित होऊन नागरिेकांना आरोग्याचे त्रास होत आहे. येथे अधिकृत उत्खनन कंपन्या दोनच असून उर्वरीत सर्व अनधिकृत आहेत. त्यांचेकडून पर्यावरणाची पूर्वपरवानगी घेतलेली नाही. प्रदुषणाची परवानगी नाही. मात्र प्रचंड प्रमाणावर व खोलवर खनिज व वाळू उत्खनन होत असून सदरील वॉशिंग प्लांटच्या जागांचे अकृषिक परवाने (एन.अे.) घेतलेले नाहीत. सदरील गांव हे इकोसेन्सेटिव्ह झोनमध्ये येत असून महसूल अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासनाचा प्रचंड प्रमाणांवर महसूल बुडविला जात आहे. परिणामी ३ कोटी ९१ लाख महसूल बुडाला आहे.तरी महोदयांनी याबाबत संबंधित बेकायदेशिर खाण, खनिज, वाळू उत्खनन करणाऱ्यां विरुद्ध आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी मनसे कणकवली तालुका अध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांनी केली आहे.
