पडवेवाडीत कारची दुचाकीला धडक

आंबोलीतील युवक गंभीर जखमी

*⚡सावंतवाडी ता.२२:-:* सावंतवाडी-आंबोली मार्गावर पेडवेवाडी येथे पर्यटकांच्या कारची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात संतोष नवलू पाटील (रा. आंबोली) हा युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला. जखमीला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, दुचाकीला धडक देऊन पळून जाणाऱ्या कार चालकाला स्थानिक युवक निखिल राठोड याने पाठलाग करून पकडले. याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त कार सावंतवाडी येथून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. तर दुचाकीस्वार संतोष पाटील हा कामानिमित्त आंबोली येथून गोव्याच्या दिशेने जात होता. या दोन्ही गाड्यांची पेडवेवाडी येथील वळणावर जोरदार धडक झाली. या अपघातानंतर दुचाकीस्वार समोरून येणार्‍या दुसर्‍या डंपरच्या खाली फेकला गेला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला स्थानिकांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

यावेळी पोलीस अधिकारी बांदेकर, आरोलकर, दळवी यांनी घटनास्थळी धाव घेत कार चालकाच्या मदतीने जखमीला रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.

You cannot copy content of this page