छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची केली स्वच्छता
कणकवली ता.२१-:* कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची साफसफाई करत सामाजिक कार्यकर्ते आनंद पारकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कणकवली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरण प्रश्नी गेले अनेक दिवस राजकारण सुरू असतानाच या पुतळ्याच्या स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत होते.
ही बाब छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाचे कार्यकर्ते आनंद पारकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी स्वतः हातात झाडू घेत या पुतळ्या जवळ वाढलेली कोळीष्टके व धूळ साफ केली. आनंद पारकर यांनी पुतळ्याच्या ठिकाणी साफसफाई करिता घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तसेच या पुतळ्याची नियमित साफसफाई व्हावी अशी मागणी देखील शिवप्रेमीमधून व्यक्त होत आहे.
