अन्यथा आंदोलन करण्याचा मनसे युवती सेना तालुकाध्यक्ष ललिता नाईक यांचा इशारा
सावंतवाडी चराठा-वझरवाडी रस्ता खड्डेमय झाला असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हे ओळखणेही मुश्किल होत असून दोन वर्षांपूर्वी येथील पुलाला भले मोठे भगदाड पडले आहे.तरी संबंधित रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी, अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युवती सेना तालुकाध्यक्ष ललिता नाईक यांनी केली आहे.
संबंधित रस्ता मागील वर्षी आमदार निधीतून मंजूर झाला परंतू निधीअभावी रखडला होता. हा रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असल्याने त्यांनी वेळीच लक्ष घालून तात्काळ रस्त्याची डागडुजी करावी. या भागामध्ये कॉलेज असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर वाहनांची रहदारी असते. मात्र ठिकठिकाणी खड्डे असल्याने वाहनचालकांना वारंवार वाहनांची दुरुस्ती करावी लागत आहे. तसेच येथील पुलाला दोन वर्षांपूर्वी भले मोठे भगदाड पडले होते. मात्र संबंधित प्रशासनाच्या दुर्ललक्षामुळे याची अद्यापपर्यंत डागडुजी झालेली नाही त्यामुळे नागरिकांनमधून नाराजी व्यक्त आहे. तरी सदर रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. परिणामी हा रस्ता तातडीने पूर्ण न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन उभारण्याचा इशारा युवती सेना तालुकाध्यक्ष ललिता नाईक यांनी दिला आहे.
