मनसे तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांची मागणी
*⚡कणकवली ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्हाच्या पालकमंत्र्याच्या सूचनेनुसार हायवे अधिकाऱ्यांनी फक्त कणकवलीच्या शिवाजी चौकातील आरओडब्लू लाईन पांढरा चुना टाकून निश्चित केली. त्याप्रमाणे त्यांनी वागदे ते जानवलीपर्यंत पुन्हा एकदा आरओडब्लू लाईन टाकून हायवेची हद्द कायमस्वरुपी निश्चित करावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांनी संबंधित खात्यांकडे केली आहे.
नवीन हायवेच्या दुतर्फा हायवे प्राधिकरणाने लोखंडी खांब किंवा सिमेंटचे पोल टाकून आरओडब्लू लाईन निश्चित करुन न ठेवल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात स्टॉल उभारुन व्यवसाय करणाऱ्या स्टॉल धारकांवर वारंवार स्टॉल हटाव माहीमेचे संकट उदभवत असते. आता कणकवलीच्या शिवाजी चौकातील शिवाजी पुतळ्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी पालकमंत्र्यांनी तेवढया १८ गुंठे जागेपुरतीच आरओडब्लू लाईन निश्चित करताना केवळ पांढरा चुना मारला आहे. त्याऐवजी सिमेंट अथवा लोखंडी पोल टाकून कायमस्वरुपी आरओडब्लू लाईन निश्चित केल्यास त्याचा फटका स्टॉलधारकांना बसणार नाही.
शिवाय स्टॉलधारकांना जिल्हा परिषदेच्या १८ गुंठे जागेपैकी जी ९ गुंठे जागा देण्यात येणार आहे. त्या जागेचा लेखी करार भाडेतत्वावर जि.प.मार्फत संबंधित स्टॉलधारकांशी करण्यात यावा. अन्यथा भविष्यात ह्यांचे सरकार गेल्यानंतर पुन्हा केव्हातरी शासनाला अथवा जि.प. ला जागेची गरज भासल्यास या स्टॉलधारकांवर गंडातर येऊ शकते याचाही विचार आत्ताच झाला पाहीजे. तसेच वागदे ते कणकवलीपर्यंत दुतर्फा आरओडब्लू लाईन कायमस्वरुपी दिसेल अशी उभारण्यात यावी. अन्यथा वारंवार स्टॉलधारकांना हटाव मोहीमांचा त्रास होऊन आर्थिक व मानसिक नुकसान पोहोचत आहे ते थांबवावे अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांनी केली आहे.
