मंगेश तळवणेकर यांचा इशारा;तृप्ती देसाई यांच्या वक्तव्याबाबत व्यक्त केली नाराजी
सावंतवाडी : भूमाता बिग्रेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आपल्या वक्तव्यातून हिंदू धर्मियांच्या भावना वेळोवेळी दुखावत आहेत. हिंदू देवदेवता व साधुसंतांचा अवमान करीत आहेत. घटनेने दिलेले स्वातंत्र्य कोणत्याही धर्माविरुद्ध बोलण्यासाठी नाही, याचे भान राखूनच वक्तव्य करा, असा विनंतीवजा इशारा विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी दिला आहे.
तळवणेकर यांनी म्हटले आहे की, हजारो वर्षांपूर्वीपासून काही मंदिरात महिलांना प्रवेश नव्हता. आमच्या सर्व महिला भगिनी-मातांनी त्याचे तंतोतंत पालन केले आहे आणि आजही काटेकोरपणे पालन करीत आहेत. अशा आमच्या श्रद्धास्थानामध्ये सरकारला वेठीस धरुन देसाई यांनी प्रवेश मिळवला. आता व यापूर्वीसुद्धा किर्तनकार व संत इंदुरीकर महाराजांवर त्यांनी तोंडसुख घेतले आहे. माणसाला ठेच लागेल तेव्हा त्यांना देवाची आठवण होते. देव त्यांना पावतो. तसेच एखाद्याने काय खावे, काय न खावे याचे मार्गदर्शन इंदुरीकर यांनी केले आहे. ते आपणा सर्वांना वडीलांसारखे आहेत. इंदुरीकर महाराज म्हणा किंवा इतर किर्तनकार व साधूसंत यांनी ईश्वराकडे प्रत्येक माणसाचे भले चिंतीले आहे. आपणाला श्रीमंती, गाड्या, बंगले असे काही नको. पण ते इतरांना दे, असे या सर्वांचे नेहमीच सांगणे असते. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे चुकीचे आहे.
तृप्ती देसाई यांनी आपल्या हुशारीचा, ज्ञानाचा उपयोग समाजोपयोगी कामांसाठी, गरीबांना न्याय देण्यासाठी करावा. पण तसे कधीही दिसले नाही. सिंधुताई सपकाळ, मेघा पाटकर यांनी आपली संपुर्ण ताकद या गोरगरीबांच्या न्याय्य हक्कांसाठी वापरली. त्यांचे नाव भविष्यातही अजरामर राहील. त्यांचा आदर्श घ्यावा. साधूसंत व किर्तनकारांनी उपदेश व अध्यात्मिक मार्गाने प्रबोधन करुन कितीतरी वाया गेलेले संसार पुन्हा मुळ पदावर आणले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी मनाई आदेश व कोरोनाचा काळ संपल्यानंतर सावंतवाडी तालुक्यासह तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विठ्ठल-रखुमाई शेतकरी महिला संघटनेच्यावतीने हजारो महिला भगिनींचा मोर्चा जिल्ह्यातील प्रत्येक तहसिलदार कार्यालयावर नेऊन हिंदू धर्म, देवदेवता तसेच साधूसंताविरुद्ध परवानगीशिवाय न बोलण्याबाबत अट घालण्याची विनंती करण्यात येणार आहे, असा इशारा तळवणेकर यांनी दिला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इंदूरीकर महाराजांची बाजू घेतली आहे, अशीच बाजू सर्व आमदार, मंत्र्यांनी घ्यावी, असे आवाहनही तळवणेकर यांनी केले आहे.
