आनंदव्हाळ घाडीवाडी येथे बंधारा उभारत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा दिला संदेश
*⚡मालवण ता.११-:* मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ घाडीवाडी येथे ज्येष्ठ ग्रामस्थ सत्यवान पाटकर यांनी अन्य ग्रामस्थांच्या सहकार्यातून कच्चा बंधारा बांधला. ज्येष्ठ ग्रामस्थांनी एकत्र येत बंधारा बांधला असून या ज्येठांचा आदर्श आजच्या तरूणांनी घ्यायला हवा. आनंदव्हाळ येथील ज्येष्ठ ग्रामस्थ सत्यवान पाटकर हे दरवर्षी घाडीवाडी भागात कच्चा बंधारा घालत पाणी अडवित आहेत.
यावर्षीही श्री. पाटकर यांनी कच्चा बंधारा साकारला आहे. या बंधाऱ्यामुळे या भागातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे. शिवाय उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाईची समस्याही दूर होण्यास मदत मिळणार आहे. ज्येष्ठ ग्रामस्थांनी साकारलेला बंधारा हा आजच्या तरुण पिढीला लाजविणारा आहे. वाहून जाणारे पाणी बंधाऱ्याच्या सहाय्याने अडवून गावच्या पाण्याच्या पातळीत वाढ कशी होईल या दृष्टीने तरुण पिढीने या ज्येष्ठ ग्रामस्थांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आपले योगदान देण्याची गरज निर्माण झाली आहे. आनंदव्हाळ येथे ज्येष्ठ ग्रामस्थांनी साकारलेल्या या कच्चा बंधाऱ्यांची ग्रामसेविका वेदिका गोसावी, कृषी सहायक डी. डी. गावडे, ग्रामपंचायत ऑपरेटर प्रिया चव्हाण यांनी भेट देत पाहणी केली. गावात जास्तीत जास्त बंधारे व्हावेत यासाठी येत्या काळात प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
