तेरेखोल नदीतील होणारी वाळूची तस्करी रोखा

अन्यथा २६ जानेवारीला किरणपाणी पुलावर उपोषण;महाराष्ट्र व गोवा मुख्यमंत्र्यांना सूर्यकांत नाईक यांचे निवेदन

सावंतवाडी ता.१०-: येथील तालुक्यातील तेरेखोल खाडी पात्रांमध्ये दररोज शेकडो होड्या राजरोसपणे अनाधिकृत वाळू उपसा करत आहेत.या अनाधिकृत वाळू उपसामुळे महाराष्ट्र गोवा राज्याचा लाखो रुपयांचा महसूल बुडतच असून किरणपाणी पुलाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे या वाळू उपसा करणार्‍या तस्करांवर त्वरित कारवाई न केल्यास 26 जानेवारी रोजी किरणपाणी पुलावर महाराष्ट्र व गोवा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सदस्य सोबत आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा सूर्यकांत विठ्ठल नाईक यांनी निवेदनाद्वारे गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की येथील तालुक्यातील तेरेखोल खाडी पात्रांमध्ये आरोंदा किरणपाणी ते गोवा राज्यातील पालये, केरी पर्यंत म्हणजेच महाराष्ट्र- गोवा या दोन्ही राज्यांमध्ये दररोज शेकडो होड्या राजरोसपणे अनाधिकृत वाळू उपसा करत आहेत. सदरचा अनधिकृत वाळूसाठा हरमल, पालये, कोरगाव येथे बंपिंग करुन ठेवला जात आहे. सदरच्या बेसुमार अनाधिकृत वाळू उपसामुळे महाराष्ट्र व गोवा राज्यांचा लाखो रुपयांचा महसुल बुडतच असून महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांना जोडणाऱ्या किरणपाणी पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सदरच्या पुलावरुन मोठ्या प्रमाणात वाहतुक चालू असते. प्रचंड वाळू उपशामुळे सदर पुलाचा पाया कमकुवत होण्याचा धोका असून भविष्यात मोठी दुर्घटना घडून जीवीत व वित्तहानी होण्याची संभावना आहे यामुळे सदर प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन, बेकायदा, बेसुमार वाळू उत्खनन करणाऱ्या तस्करांवर त्वरीत कायदेशीर कारवाई करुन, त्यांच्याकडून दंडाची व्याजासह वसूली करण्यात यावी. अन्यथा दि. २६ जानेवारी पासून महाराष्ट्र व गोवा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी किरणपाणी पुलावर बसून उपोषण सुरु करणार आहोत उपोषणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र व गोवा राज्य प्रशासनाचीच राहणार आहे याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरीत उचित कारवाई व कार्यवाही करण्यात यावी

You cannot copy content of this page