आव्हानांचा सामना करीत स्वाभिमानी पत्रकारिता

मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांचे प्रतिपादन;मालवण तालुका पत्रकार पुरस्कार वितरण उत्साहात

मालवण (प्रतिनिधी) लोकशाही चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराच्या समस्या आणि दुःख हे आजही समाजाला मात्र समजलेले नाही. पत्रकारही आपल्या व्यथा कधी सांगू शकत नाहीत. स्वाभिमानाने काम करतो म्हणूनच तो पत्रकार म्हणून उभा राहतो. अशा आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीतही काम करणाऱ्या पत्रकारांची एकजूट कायम ठेवून मालवण पत्रकार समिती चांगले कार्य करत आहे. जिल्ह्यात मालवण पत्रकार समितीचे कार्य उल्लेखनीय व कौतुकास्पद असेच आहे, असे गौरवोद्गार मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्री. गजानन नाईक यांनी येथे बोलताना केले.

आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू केल्याच्या दिवसानिमित्त साजऱ्या होणाऱ्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने मालवण तालुका पत्रकार समितीतर्फ़े पत्रकार दिन कार्यक्रम व पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा मालवण धुरीवाडा येथील संस्कार हॉल येथे बुधवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच बाळशास्त्री जांभेकर यांच्यासह कै. नरेंद्र परब व कै. भाईसाहेब खंडाळेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, जि. प. चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, मालवणचे सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव उमेश तोरसकर, प्रसिद्धी प्रमुख हरिश्चंद्र पवार, कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे सन २०२०-२१ या वर्षाचे पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार पत्रकार महेश सरनाईक, कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कार पत्रकार संदीप बोडवे तर पत्रकार अमित खोत पुरस्कृत ‘बेस्ट स्टोरी अवार्ड’ हा विशेष पुरस्कार पत्रकार सिद्धेश आचरेकर यांना प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच प्रशासकीय सेवेत सर्वोत्कृष्ट व लोकाभिमुख सेवा बजावत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उपमुख्यकार्यकरी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर मालवण पंचायत समितीचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त झालेले अमित खोत, जिल्हा पत्रकार संघाचा उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार जाहीर झालेले समीर म्हाडगुत आणि पोईप सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत विजयी झालेले पत्रकार संतोष हिवाळेकर यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक करताना संतोष गावडे यांनी मालवण पत्रकार समितीच्या कामाचा आढावा घेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम समितीतर्फ़े राबविण्यात येतील असे सांगितले. यावेळी बोलताना गजानन नाईक यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांना जास्त संधी व न्याय मिळत नाही, त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच हिंदी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाबुराव पराडकर यांचे पराड येथे स्मारक उभारण्याबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत, असेही नाईक यांनी सांगितले. तर गणेश जेठे यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असला तरी पत्रकारांना तलवारीच्या धारेवरून चालावे लागते. पत्रकारांनी पत्रकारितेबरोबरच समाजासाठी काही करता येईल हे पाहिलं पाहिजे, आपल्या कामातून इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्यातील पत्रकार भवनाचे काम प्रगतीपथावर असून येत्या दोन महिन्यात काम पूर्ण होईल, असे सांगितले. तर राजेंद्र पराडकर यांनी मालवणच्या विकासात पत्रकारांची मोठी भूमिका असून पत्रकारांच्या मार्गदर्शनातून तालुक्यात विकासाच्या विविध संकल्पना प्रशासनाकडून राबविल्या गेल्या, असे सांगत मालवण तालुका पत्रकार समितीच्या कार्याचे कौतुक केले. तर अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, उमेश तोरसकर यांनीही मनोगत व्यक्त करत मालवण पत्रकार समितीच्या कामाची प्रशंसा केली. सूत्रसंचालन सौगंधराज बादेकर यांनी केले. पुरस्कार सन्मानपत्राचे वाचन अमित खोत यांनी केले. तर आभार सचिव कृष्णा ढोलम यांनी मानले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, अगोस्तीन डीसोजा, उमेश मांजरेकर, जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणी सदस्य विद्याधर केनवडेकर, माजी अध्यक्ष प्रफुल्ल देसाई, उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, मनोज चव्हाण, कुणाल मांजरेकर, प्रशांत हिंदळेकर, नितीन आचरेकर, अनिल तोंडवळकर, महेंद्र पराडकर, सुरेश ठाकूर, आप्पा मालंडकर, संग्राम कासले, महेश कदम, नितीन गावडे, अर्जुन बापर्डेकर, केशव भोगले, भूषण मेतर, ओंकार यादव, उमेश शिरोडकर, सौ. नूतन वराडकर आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page