भुईबावडा येथील तीन मंदिरात चोरी …

रोख रक्कमेसह साहित्य लंपास; पोलिस घटनास्थळी दाखल

वैभववाडी प्रतिनिधी भुईबावडा गावातील तीन मंदिरामध्ये चोरट्यांनी डल्ला मारत रोख रक्कम व साहित्य लंपास केले आहे. या चोरीच्या घटनेने भुईबावडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक अतुल जाधव हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. भुईबावडा गावातील रवळनाथ मंदिर, गांगो मंदिर व विठ्ठल मंदिर या तीन मंदिरात चोरट्यांनी चोरी केली आहे. दानपेटीतील काही रक्कम व मंदिरात असलेल्या सिलेंडर शेगड्या, भरलेले सिलेंडर, सहा घंटा व स्वयंपाकाची भांडी आदी साहित्य चोरट्यांनी लांबविले आहे.

दीड महिन्यापूर्वी करुळ व कुंभवडे गावातील मंदिरात चोरी झाली होती. त्याचा छडा लावण्यात वैभववाडी पोलिसांना यश आले होते. तो चोरटा जेरबंद आहे. पुन्हा एकदा तालुक्यात चोरीची घटना घडल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रविण देसाई, पोलीस श्री. तावडे, श्री मारुती साखरे, जायभाय आदी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेचा पंचनामा सुरू असून वैभववाडी पोलीस तपास करत आहेत.

You cannot copy content of this page