दांडेलीतील बीएसएनएलसेवा ‘नॉटरिचेबल’

बिले भरूनही लॅण्डलाईन बंद

बांदा ः प्रतिनिधी सध्याच्या डिजिटल युगात सर्वत्र इंटरनेटची सुविधा असून सावंतवाडी तालुक्यातील दांडेली गावात अद्याप कोणत्याही कंपनीचे नेटवर्क मिळत नाही. बाजारवाडीमध्ये तर बिले वेळेवर भरूनही लॅण्डलाईन सेवा बंद असल्याने ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बीएसएनएल सेवेचा सुरू असलेला बोजवारा थांबवून तात्काळ सुरळीत सेवा द्यावी अन्यथा ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा दांडेली माजी सरपंच संजू पांगम यांनी बीएसएनएलला दिला आहे.

दांडेली-बाजारवाडी येथे जिल्हा बँक, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, मेडिकल सेवा असल्याने दिवसाकाठी शेकडो नागरिक कामासाठी येतात. परंतु बीएसएनएल सेवा बंद किंवा विस्कळीत असल्याने शासकीय कामे करताना अनंत अडचणी येतात परिणामी कामे न झाल्याने नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागते. विद्यार्थ्यांना तर ऑनलाइन शिक्षण घेताना नेटवर्क मिळणेही दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे बिले वेळेवर भरूनही घरातील फोन बंद आहेत. प्रशासनाने याचा विचार करून दांडेली गावासाठी मिनी टॉवरचा प्रस्ताव करावा व दांडेली गाव रेंजमध्ये आणावे अशी मागणी संजू पांगम यांनी केली आहे.

You cannot copy content of this page