जिल्हा बँकेचे नूतन संचालक सुशांत नाईक यांनी लगावला टोला
*⚡कणकवली ता.०५-: पाच वेळा पराभवाची धुळ चाखणाऱ्या भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आम्हाला सहकार शिकवण्याची भाषा करू नये. सुज्ञ मतदारांनी कौल दिल्याने आमचा विजय झाला आहे. राजन तेली यांच्याकडून सल्ला घेण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही. असा टोला जिल्हा बँकेचे नूतन संचालक सुशांत नाईक यांनी लगावला आहे.राजन तेली यांनी आपल्या पक्षातील गद्दारांवर कारवाई करावीच असा सल्ला देतानाच त्यांनी त्यांची नावे देखील जाहीर करावी असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे.
कणकवली मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.नाईक म्हणाले,आम वैभव नाईक व माजी पालकमंत्री दीपक केसरकर हे जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत.त्यामुळे पाच वेळा पराभूत हॊणाऱ्या तेली यांनी आम्हाला शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. सतीश सावंत, व्हिक्टर डोन्टस, जीवनप्रसाद बांदेकर यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेवू असे सांगतानाच सुशांत नाईक म्हणाले,आम वैभव नाईक यांच्यावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही.
आमचा विजय हा शिवसेनेने घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे .त्यामुळे राजन तेली यांना वाटत असेल तर त्याचा पराभव हा गद्दारीने झाला असेल तर गद्दारावर त्यांनी कारवाई करावीच ,त्याशिवाय नावे देखील जाहीर करावी असे आव्हान नाईक यांनी दिले आहे. तसेच जिल्हा बँकेत आमचे 8 सदस्य निवडून आले असून 2400 कोटी ठेवी असलेल्या जिल्हा बँकेच्या ठेवीदाराचे हित जोपसण्यासाठी व सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवण्याचे काम करणार असल्याचे सांगितले.पाच वेळा पराभवाची धुळ चाकणाऱ्या तेली यांनी आम्हाला शिकवू नये. असे ते म्हणाले.
